"फराह तुला माफी मागायला हवी!"; दिलीपचा डान्स बघून किंग खानची प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाला-
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 17:37 IST2025-08-26T17:36:31+5:302025-08-26T17:37:08+5:30
शाहरुख खानच्या लेक आर्यन खानच्या आगामी सीरिजमधील एका गाण्यावर फराह खानचा कूक दिलीपने डान्स केलाय. त्यावर शाहरुखने त्याची स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे

"फराह तुला माफी मागायला हवी!"; दिलीपचा डान्स बघून किंग खानची प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाला-
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खानने तिच्या घरातील कूक अर्थात दिलीपचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यात तो आर्यन खानच्या ‘बार्ड्स ऑफ बॉलिवूड’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओवर बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने एक कमेंट केली आहे, ज्यामुळे दिलीप - फराहचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. जाणून घ्या
शाहरुख खानचा व्हिडीओ चर्चेत
फराह खानने शेअर केलेल्या व्हिडिओवर शाहरुख खानने एक मजेशीर कमेंट केली आहे. त्याने फराह खानला उद्देशून लिहिले, “तू माझी माफी मागायला हवीस. कारण ३० वर्षांत दिग्दर्शन करताना तू दिलीप जशी करतोय तशी अप्रतिम डान्स स्टेप्स कधी मला शिकवली नाहीस. तरीही तुझ्यावर माझे प्रेम आहे.” अशाप्रकारे शाहरुखने फराह आणि दिलीपच्या व्हिडीओवर मजेशीर कमेंट केली आहे. याशिवाय दिलीपच्या डान्सला पसंती दिली आहे.
फराहने शाहरुखला दिला असा रिप्लाय
शाहरुखच्या या कमेंटला फराह खाननेही मजेशीर अंदाजात उत्तर दिले. ती म्हणाली, “आता पाहूया, दिलीप ट्रेनच्या छतावर डान्स करू शकतो का?” असं म्हणत फराहने शाहरुखला ‘दिल से’ चित्रपटातील ‘छैय्या छैय्या’ या गाण्याची आठवण करून दिली, ज्यामध्ये शाहरुखने ट्रेनच्या छतावर डान्स केला होता आणि त्याची कोरिओग्राफी फराहनेच केली होती.
शाहरुखच्या लेकाच्या आगामी प्रोजेक्टची चर्चा
शाहरुखचा लेक आर्यन खानच्या 'बार्डस ऑफ बॉलिवूड'चा फर्स्ट प्रीव्ह्यू काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. फराह खानने देखील आर्यनच्या सीरिजमधलं जे गाणं रिलीज झालं त्यावर दिलीपला डान्स करायला लावला आहे. फराहने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “मी आर्यन आणि शाहरुखची माफी मागते, पण गाणे इतके चांगले आहे की दिलीप स्वतःला थांबवू शकला नाही.” या व्हिडिओमुळे आर्यनच्या वेब सीरिजची देखील चर्चा अधिक वाढली आहे.