शाहिद-करीनाला पुन्हा एकत्र बघून दिग्दर्शक इम्तियाज अलींची प्रतिक्रिया; म्हणाले- "आनंद झाला पण..."
By देवेंद्र जाधव | Updated: March 13, 2025 08:14 IST2025-03-13T08:14:07+5:302025-03-13T08:14:43+5:30
शाहिद कपूर-करीना कपूर यांच्यासोबत जब वी मेट २ बनवणार का याविषयी इम्तियाज अलींनी मौन सोडलंय (shahid kapoor, imtiaz ali)

शाहिद-करीनाला पुन्हा एकत्र बघून दिग्दर्शक इम्तियाज अलींची प्रतिक्रिया; म्हणाले- "आनंद झाला पण..."
काहीच दिवसांपूर्वी आयफा पुरस्कार सोहळा २०२५ जयपूरला संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यासाठी सर्व कलाकार एकत्र आले होते. पण सर्वांचं लक्ष दोन कलाकारांनी वेधलं ते म्हणजे शाहिद कपूर(shahid kapoor) आणि करीना कपूर (kareena kapoor). दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली, हात मिळवले अन् दिलखुलास गप्पा मारल्या. ब्रेकअपनंतर जाहीर इव्हेंटमध्ये प्रथमच शाहिद-करीना यांना अशा मनमोकळ्या अंदाजात पाहून चाहत्यांना आनंद झाला. अशातच या दोघांच्या भेटीवर दिग्दर्शक इम्तियाज अलींनी (imtiaz ali) मौन सोडलंय.
शाहिद-करीनाच्या भेटीवर इम्तियाज काय म्हणाले?
आयफा पुरस्कार सोहळ्यात शाहिद-करीना एकत्र आल्यावर 'जब वी मेट' सिनेमाचे दिग्दर्शक इम्तियाज अलींनी याविषयी प्रतिक्रिया दिली. इम्तियाज यांच्या २००७ साली आलेल्या 'जब वी मेट' सिनेमात शाहिद-करीनाने एकत्र काम केलं अन् त्यांच्या प्रेमाचे सूर जुळले. याविषयी इम्तियाज यांना विचारलं असता ते म्हणाले, "शाहिद आणि करीनाला एकत्र पाहून छान वाटलं. परंतु जब वी मेटचा सीक्वल बनवण्याची माझी इच्छा नाही."
"जब वी मेट सिनेमाला मी तिथेच सोडू इच्छितो. पुन्हा या सिनेमावर काम करुन मी मूळ सिनेमाची मजा खराब करु इच्छित नाही. शाहिद-करीनाला घेऊन कोणताही नवीन सिनेमा बनवण्याचाही माझा सध्या प्लान नाही. परंतु दोघांसोबत आधी काम करुन मला खूप चांगलं वाटलं होतं." अशा शब्दात इम्तियाज अलींनी प्रतिक्रिया दिली आहे. एकूणच 'जब वी मेट २' कधीच बनणार नाही, हे यामुळे कन्फर्म झालंं आहे.