पोलीस की माफिया? शाहिद कपूरच्या 'देवा'चा जबरदस्त ट्रेलर, मराठमोळ्या कलाकारांनी वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 14:48 IST2025-01-17T14:47:58+5:302025-01-17T14:48:52+5:30
'देवा' सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून शाहिद कपूरच्या दमदार परफॉर्मन्सने चार चाँद लावले आहेत (deva, shahid kapoor)

पोलीस की माफिया? शाहिद कपूरच्या 'देवा'चा जबरदस्त ट्रेलर, मराठमोळ्या कलाकारांनी वेधलं लक्ष
शाहिद कपूरचे सिनेमे त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणी असतात. शाहिद कधी रोमँटिक अंदाजात दिसतो तर कधी रावडी अॅक्शन करताना दिसतो. आता गेल्या काही दिवसांपासून शाहिदच्या चर्चेत असलेल्या 'देवा' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. आज मुंबईत 'देवा'चा ग्रँड ट्रेलर लाँच करण्यात आला. या ट्रेलरमध्ये शाहिदचा जबरदस्त अभिनय आणि तगडी अॅक्शन बघायला मिळतेय. याशिवाय 'देवा'च्या ट्रेलरमध्ये मराठमोळ्या कलाकारांनी लक्ष वेधलं आहे.
'देवा'चा ट्रेलर रिलीज
शाहिद कपूरच्या 'देवा' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला मुंबईतील एक कोळीवाडा दिसतो. बॅकग्राऊंडला शाहिद कपूरचा आवाज दिसतो. "अब हमारी बारी है", असं म्हणत शाहिद कपूरची डॅशिंग एन्ट्री होते. नंतर शाहिद गुंडांशी दोन हात करताना दिसतो. शाहिदचा अवतार पाहून तो पोलीस आहे की माफिया असा प्रश्न सर्वांना पडतो. 'देवा'मध्ये एक रहस्य दिसतं ज्याचा शोध शाहिद घेताना दिसतो. हे रहस्य नेमकं काय? शाहिदला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागणार? याची कहाणी 'देवा'मध्ये दिसते.
'देवा' कधी रिलीज होतोय
रोशन अँड्य्रूज यांनी 'देवा'चं दिग्दर्शन केलंय. 'देवा' सिनेमात शाहिद कपूरसोबत अभिनेत्री पूजा हेगडे झळकणार आहे. इतकंच नव्हे 'देवा'मध्ये दोन मराठी अभिनेत्यांनी सर्वांचं लक्ष वेधलंय. ते म्हणजे अभिनेता सिद्धार्थ बोडके आणि अभिनेते गिरीश कुलकर्णी. याशिवाय 'देवा' सिनेमात शाहिद देव आंब्रे या मराठी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे सिनेमातही शाहिदच्या तोंडी मराठी संवाद असले तर आश्चर्य वाटायला नको. ३१ जानेवारी २०२५ ला 'देवा' सिनेमा सगळीकडे रिलीज होतोय.