१५ वर्षांनी शाहिद कपूर 'कमीने'मधील 'धन-ते-नन' गाण्यावर बेभान नाचला; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 14:42 IST2025-01-04T14:41:54+5:302025-01-04T14:42:33+5:30
शाहिद कपूरने त्याच्याच गाजलेल्या कमीने सिनेमातील गाण्यावर जोशपूर्ण डान्स करुन सर्वांची पसंती मिळवली आहे (shahid kapoor, deva)

१५ वर्षांनी शाहिद कपूर 'कमीने'मधील 'धन-ते-नन' गाण्यावर बेभान नाचला; व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता शाहिद कपूर हा विविध सिनेमांमधील त्याच्या भूमिकेमुळे चर्चेत असतो. शाहिदला आपण 'जब वी मेट', 'बदमाश कंपनी', 'आर.राजकुमार', 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' अशा सिनेमांमधून विविधरंगी भूमिका साकारताना पाहिलंय. शाहिदच्या आगामी 'देवा' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. अशातच देवाच्या सेटवरील शाहिदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत शाहिद त्याच्याच गाजलेल्या धन-ते-नान गाण्यावर बेभान नाचताना दिसत आहे.
शाहिदचा 'कमीने'मधील गाण्यावर डान्स
शाहिद कपूरने २००९ साली विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'कमीने' सिनेमात काम केलं. या सिनेमात शाहिदचा डबल रोल होता. याच सिनेमातील 'धन-ते-नान' हे गाणं आजही पार्टी, इव्हेंटमध्ये हमखास वाजतं. आगामी 'देवा' सिनेमाच्या सेटवर शाहिदने त्याच्या याच गाण्यावर तुफान डान्स केला. शाहिदसोबत 'देवा' सिनेमाची संपूर्ण टीमही बेभान नाचली. शाहिदच्या डान्सला सर्वांनी दाद दिली. शाहिदनेही उत्साहात नाचत सर्व टीमसोबत धमाल केली. तब्बल १५ वर्षांनी शाहिदला 'धन-ते-नान' गाण्यावर डान्स करताना बघून त्याच्या चाहत्यांनी व्हिडीओला पसंती दिलीय.
शाहिदचा आगामी देवा कधी होतोय रिलीज?
शाहिद कपूरचा आगामी 'देवा' सिनेमा ३१ जानेवारी २०२५ ला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूरच्या 'देवा' या सिनेमाचं दिग्दर्शन प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक रोशन एंड्रयूज यांनी केलं आहे. शिवाय झी स्टुडिओ आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी याची निर्मिती केली आहे. या सिनेमामुळे शाहिद कपूर जवळपास वर्षभरानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. शाहिदसोबत या सिनेमात पूजा हेगडे अभिनेत्री म्हणून झळकणार आहे.