Video: स्टेजवर सर्वांसमोर सेल्फी घेत होता चाहता, शाहरुखने अचानक फोन काढून घेतला अन्....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:33 IST2026-01-20T13:31:46+5:302026-01-20T13:33:50+5:30
शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाहरुख खान सेल्फी घेणाऱ्या फॅनसोबत उद्धटपणे वागला असं चाहत्यांचं मत आहे

Video: स्टेजवर सर्वांसमोर सेल्फी घेत होता चाहता, शाहरुखने अचानक फोन काढून घेतला अन्....
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या एका वेगळ्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. सौदी अरेबियामध्ये पार पडलेल्या 'जॉय अवॉर्ड्स' (Joy Awards) मधील त्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असून, यामुळे त्याला नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख एका चाहत्याचा फोन काढून घेताना दिसत असल्याने सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.
नेमकी घटना काय?
जॉय अवॉर्ड्सच्या एका कार्यक्रमादरम्यान शाहरुख खान स्टेजवर उभा होता. यावेळी त्याच्यासोबत काही चाहतेही उपस्थित होते, ज्यांना पुरस्कार मिळणार होता. व्हिडिओमध्ये दिसतं की, एक चाहता शाहरुखसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, शाहरुखला हे आवडले नाही आणि त्याने अचानक त्या चाहत्याच्या हातातील फोन काढून घेतला. बाजूला उभा असलेला असाच एक चाहता फोन काढायचा प्रयत्न करत असताना शाहरुख त्यालाही फोन ठेवायला सांगतो. या प्रसंगामुळे कायम हसतमुख असणाऱ्या शाहरुखच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसते.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शाहरुख खानवर जोरदार टीका होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्याला 'अहंकारी' आणि 'गर्विष्ठ' म्हटले आहे. एका युजरने लिहिले की, "स्टारडम डोक्यात गेले आहे, चाहत्यांशी वागण्याची ही कोणती पद्धत आहे?" तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, "एवढा राग कशासाठी? तो फक्त एक सेल्फीच तर मागत होता."
दुसरीकडे काही चाहत्यांनी मात्र शाहरुखची बाजू सावरून धरली आहे. त्यांच्या मते, शाहरुख कदाचित सुरक्षिततेच्या कारणास्तव किंवा कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलमुळे तसे वागला असावा. कारण समोर इतके कॅमेरे फोटो काढत असल्याने त्या चाहत्याने स्वतःच्या फोनवरुन सेल्फी घेऊ नये, अशी त्याची इच्छा असणार.