नीना गुप्तांनी शाहरूख खान, करण जोहरला म्हटले मतलबी! हे आहे कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 10:43 IST2019-04-19T10:29:40+5:302019-04-19T10:43:19+5:30
नीना यांनी शाहरूख खान व करण जोहर यांना मुलगी मसाबाच्या डोक्यातचे अॅक्टिंगचे भूत उतरवण्यासाठी मदत मागितली होती. पण या मदतीच्या अनुषंगाने नीना यांना एक कटू अनुभव आला.

नीना गुप्तांनी शाहरूख खान, करण जोहरला म्हटले मतलबी! हे आहे कारण!!
‘बधाई हो’ फेम नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता बॉलिवूडमध्ये स्टार बनू इच्छित होती. अॅक्टिंगमध्ये करिअर करू इच्छित होती. खरे तर नीना यांनी स्वत: मसाबाला अॅक्टिंगचा नाद सोडण्याचा सल्ला दिला होता. पण लेक मानायला तयार नव्हती. शेवटचा उपाय म्हणून नीना यांनी शाहरूख खान व करण जोहर यांना मसाबाच्या डोक्यातचे अॅक्टिंगचे भूत उतरवण्यासाठी मदत मागितली होती. पण या मदतीच्या अनुषंगाने नीना यांना एक कटू अनुभव आला. अलीकडे एका मुलाखतीत नीना यांनी स्वत: या कटू अनुभवाबद्दल सांगितले.
राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत नीना यांनी तो किस्सा सांगितला. एकदा मी फ्लाईटध्ये शाहरूख व करणला भेटले. मसाबाला अॅक्टिंग न करण्याबद्दल समजवा, अशी विनंती मी दोघांना केली. दोघांनीही मला स्वत:चे फोन नंबर दिले आणि मला कॉल करायला सांगितले. पण नंतर जेव्हा मी त्यांना फोन केलेत, तेव्हा दोघांपैकी एकानेही माझा कॉल उचलला नाही, असे नीना गुप्तांनी सांगितले. एवढेच नाही तर, हे लोक किती मतलबी आणि खालच्या स्तराचे लोक आहेत, हे मला त्या दिवशीच कळून चुकले होते,असेही हसत हसत त्या म्हणाल्या.
माझी मुलगी मसाबा अॅक्टिंगमध्ये काहीही करू शकणार नाही, हे मला ठाऊक होते. त्यामुळे तिने यात वेळ वाया घालवू नये, असे मला वाटायचे. मी तिला याबद्दल स्पष्टपणे सांगितले होते. तुझा चेहरा आणि तुझी बॉडी बघता, बॉलिवूडमध्ये तुला कुणीही विचारणार नाही. तुझ्यात कितीही प्रतिभा असू देत, ते तुला हिरोईन कधीही बनवणार नाहीत. हेमा मालिनी व आलिया भट तू कधीही बनू शकणार नाहीत. तुला खरोखरच अॅक्टिंग करायचे असेल तर तू विदेशात जा, असे मी तिला समजावले होते, असेही नीनांनी या मुलाखतीत सांगितले.
मसाबा आज बॉलिवूडची एक सुप्रसिद्ध फॅशन डिझाईनर आहे. जगभरात अनेक ठिकाणी तिचे फॅशन स्टोर्स आहेत. मसाबा गुप्ता ही अभिनेत्री नीना गुप्ता आणि माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची कन्या आहे. नीना आणि विवयन यांचे लग्न झालेले नाही.