‘धुरंधर’ फेम सारा अर्जुन आता बनणार इम्तियाज अलीची ‘हीर’? लवकरच होणार अधिकृत घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:57 IST2026-03-04T12:57:03+5:302026-03-04T12:57:37+5:30
सारा अर्जुनला लागली लॉटरी

‘धुरंधर’ फेम सारा अर्जुन आता बनणार इम्तियाज अलीची ‘हीर’? लवकरच होणार अधिकृत घोषणा
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री सारा अर्जुन चर्चेत आहे. रणवीर सिंहसोबतच्या तिच्या केमिस्ट्रीचे आणि अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. या यशानंतर आता साराचे नाव प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी 'हीर रांझा' या बिग बजेट लव्ह स्टोरीशी जोडले जात आहे. एकता कपूर या चित्रपटाची निर्मिती करत असून, इम्तियाज यांचे बंधू साजिद अली या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
२०१८ मध्ये आलेल्या ‘लैला मजनू’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्याच धर्तीवर आता 'हीर रांझा'ची निर्मिती केली जात असून, व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या चित्रपटासाठी निर्माते नव्या आणि आश्वासक चेहऱ्यांच्या शोधात आहेत. ताज्या रिपोर्ट्सनुसार, 'हीर'च्या मुख्य भूमिकेसाठी सारा अर्जुनचं नाव सर्वात वरती आहे आणि तिच्या नावावर सध्या गांभीर्याने विचार सुरू आहे.
मिड-डेच्या अहवालानुसार, ‘धुरंधर’ मधील साराच्या कामगिरीमुळे ती आजच्या काळातील सर्वात आश्वासक तरुण अभिनेत्री म्हणून समोर आली आहे. जरी अद्याप तिचे नाव अधिकृतपणे निश्चित झाले नसले, तरी सर्व काही जुळून आल्यास सारा लवकरच 'हीर'च्या रूपात पडद्यावर दिसेल. या चित्रपटाचे चित्रीकरण येत्या काही महिन्यात सुरु होऊ शकतं.
दुसरीकडे, सारा सध्या तिच्या आगामी ‘धुरंधर २’ मुळेही चर्चेत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने जगभरात १३०० कोटींहून अधिक कमाई करून विक्रम प्रस्थापित केला होता. आता १९ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिक्वेलमध्ये सारा पुन्हा एकदा रणवीर सिंहसोबत 'यलीना'च्या भूमिकेत झळकणार आहे. 'धुरंधर २' च्या प्रदर्शनानंतर साराच्या करिअरला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.