संजू राठोडला पाहताच शाळकरी मुलांनी गायलं 'सुंदरी सुंदरी', व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:47 IST2025-11-10T13:47:09+5:302025-11-10T13:47:29+5:30
अचानक मुलांकडून मिळालेल्या या जबरदस्त प्रतिसादाने गायक संजू राठोडही थक्क झाला.

संजू राठोडला पाहताच शाळकरी मुलांनी गायलं 'सुंदरी सुंदरी', व्हिडीओ होतोय व्हायरल
संजू राठोड हा मराठी चेहरा सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. महाराष्ट्रातील जळगाव येथील धनवड (Dhanwad) गावातून आलेल्या संजूची प्रत्येक गाणी सुपरहिट ठरत आहेत. 'गुलाबी साडी' असो 'शेकी' असो किंवा 'सुंदरी सुंदरी' असो संजू राठोडच्या प्रत्येक गाण्याने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मोठ्यांपासून अगदी लहानांपर्यंत सर्व जण संजूला ओळखतात, त्याच्यावर प्रेम करतात. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. संजू राठोडचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये शाळकरी मुलं भर ट्रॅफिकमध्ये त्याच्यासाठी गाणं गाताना दिसली आहेत.
ट्रॅफिकमध्ये संजू राठोडची गाडी एका शाळेच्या बसशेजारी थांबली. तेव्हा आपल्या बस शेजारी संजू राठोडची गाडी आहे, हे समजताच त्यातली मुलं प्रचंड खुश झाली. संजूची एक झलक पाहण्यासाठी सगळे खिडकीपाशी आले आणि त्याला पाहून एकदम उत्साहित झाले. त्यानंतर त्यांनी मोठ्या आवाजात त्याचंच सुपरहिट गाणं 'सुंदरी सुंदरी' गाणं सुरू केलं. भर ट्रॅफिकमध्ये अचानक मुलांचा हा जल्लोष पाहून संजू राठोड काही क्षण स्तब्धच झाला. नंतर तो हसत-हसत त्यांच्याकडे पाहत राहिला. संजूच्या सोशल मीडिया फॅन पेजवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
संजू राठोडने आपल्या कलेने मराठी संगीताला एक नवी ओळख दिली आहे. संजूच्या घरात संगीताची कसलीच पार्श्वभूमी नव्हती. तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. पण, मनात संगीताविषयीचं प्रेम मात्र कायम होतं. संजूने संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी विशेष असं शिक्षण देखील घेतलेलं नाहीये. त्याच्याकडे सेकंड-हँड लॅपटॉप आणि इअरफोन्स होते. यावर त्याने गाणी बनवायला सुरुवात केली, सतत काम करत राहिला आणि अखेरीस संयमी आणि लाजाळू असलेल्या संजूच्या पदरी यश पडलं. आता तो एकामागोमाग एक अशी सुपरहिट गाणी झपाट्याने देत आहे. भारताबाहेरही त्याच्या गाण्यांना चांगली पसंती मिळत आहे.