मुंबईत येऊन पानटपरीवर राहिला, १५० रुपयांसाठी ढाब्यावर कप धुतले; आता बॉलिवूड गाजवतोय अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 16:10 IST2025-09-14T16:08:16+5:302025-09-14T16:10:30+5:30
संजय मिश्रा हे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध नाव आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून त्यांनी अभिनयाची छाप पाडली. आता घाशीराम कोतवाल या नाटकाच्या हिंदी रूपांतराच्या माध्यमातून तब्बल ३० वर्षांनंतर ते या नाटकाच्या हिंदी रंगभूमीवर परतत आहेत.

मुंबईत येऊन पानटपरीवर राहिला, १५० रुपयांसाठी ढाब्यावर कप धुतले; आता बॉलिवूड गाजवतोय अभिनेता
संजय मिश्रा हे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध नाव आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून त्यांनी अभिनयाची छाप पाडली. आता 'घाशीराम कोतवाल' या नाटकाच्या हिंदी रूपांतराच्या माध्यमातून तब्बल ३० वर्षांनंतर ते या नाटकाच्या हिंदी रंगभूमीवर परतले आहेत.
संजय मिश्रा हे अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातून आले होते. त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणीविषयी सांगितलं होतं की बालपणापासूनच माझे अभ्यासात मन लागत नव्हते. घरचे अभ्यासाचा दबाव आणायचे. एकदा मी खूप वैतागलो. आईच्या पर्समधून ५० रुपये चोरले आणि घर सोडून गेलो. रेल्वेस्थानकावर काचेचे ग्लास विकायला सुरुवात केली. ५०० रुपये कमावले. एकदा वडिलांना दिसलो. ते म्हणाले, एवढंच तुझं डोकं चालते तर चांगल्या कामात लक्ष का घालत नाहीस. किमान साध्या नोकरीपुरता तरी शिक. ही गोष्ट मला फार लागली, मी पुन्हा कधी घर सोडलं नाही. पालकांची एखादी गोष्ट मनाला लागली तरी चुकीचे पाऊल उचलू नका. आज मुले आत्महत्या करतात. ते विसरतात की आपल्या मागे राहणाऱ्यांचे काय होईल?
पानवाल्याच्या दुकानात राहिलो
अभिनेता व्हायला बिहारमधून मुंबईत आलो. नातेवाइकाकडे थांबलो. त्याच्या परिवाराची गैरसोय पाहून संकोच वाटला. त्यांचे घर सोडले. दुसऱ्या मित्राकडे गेलो. पुढे तोही म्हणाला की, दुसरीकडे व्यवस्था पाहा. नंतर एका मित्राच्या पानटपरीच्या दुकानात काही दिवस राहिलो. भटकंती करत दिवस काढले. दिवसभर दिग्दर्शकांच्या ऑफिसमध्ये चकरा मारायचो.
मृत्यूला अगदी जवळून पाहिले
मी मृत्यूला जवळून पाहिले. त्यामुळे आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. एकवेळ अशी आली की, मला पोटात इन्फेक्शन झाले. मी खूप आजारी पडलो. बरा झालो. काही दिवसांतच माझ्या वडिलांचे निधन झाले. मी फार खचून गेलो होतो. माझा श्वास घुसमटू लागला होता. त्यामुळे मी ऋषिकेशला गेलो आणि गंगाच्या काठी एका ढाब्यावर काम करू लागलो. हा निर्णय मी माझ्या मनाच्या शांतीसाठी घेतला होता. काही काळाने पुन्हा मी मुंबईला परतलो. ढाबामालकाने मला सांगितले की, तुला दररोज ५० कप धुवावे लागतील. नाश्ता तयार करावा लागेल. त्याबदल्यात तुला १५० रुपये मजुरी देऊ. हे मान्य करून मी ते काम केले.
कमी लेखले म्हणून मी येथपर्यंत आलो
लहानपणापासूनच मला कमी लेखले गेले. सगळीकडे माझी तुलना इतरांशी करून मला दुबळे समजले जायचे; पण मला मिळालेली हीच वागणूक माझ्या आयुष्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. कारण त्याच भावनेमुळे मी दुप्पट मेहनत केली. आणि त्या मेहनतीचा परिणाम आज सर्वांसमोर आहे. अर्थात संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात असतोच. संघर्षाशिवाय जीवन नाही.
(संकलन : महेश घोराळे)