'अफझल खान'च्या भूमिकेतील संजय दत्तचा 'डेडली' लूक; 'राजा शिवाजी'च्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:47 IST2025-12-12T13:39:41+5:302025-12-12T13:47:01+5:30
संजय दत्तचा 'राजा शिवाजी'मधील 'अफझल खान'चा लूक आला समोर, व्हिडिओ पाहा

'अफझल खान'च्या भूमिकेतील संजय दत्तचा 'डेडली' लूक; 'राजा शिवाजी'च्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल
Sanjay Dutt As Afzal Khan Video Viral : अभिनेता रितेश देशमुख गेल्या काही महिन्यांपासून 'राजा शिवाजी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. हा ऐतिहासिक सिनेमा रितेश-जिनिलियासाठी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. यामुळे अभिनेता रात्रंदिवस या चित्रपटासाठी मेहनत घेत असल्याचं पाहायला मिळतंय. छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या या चित्रपटात अनेक बॉलिवूड कलाकारांची वर्णी लागलेली आहे. 'राजा शिवाजी' या भव्य चित्रपटामध्ये संजय दत्त हा 'अफजल खानाची' भूमिका साकारतोय. आता पहिल्यांदाचा अफजल खानच्या भूमिकेतील संजय दत्तचा लूक समोर आला आहे.
अफजल खानच्या लूकमधील संजय दत्तचा व्हिडीओ पिंकव्हिलाने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. संजय दत्तचा लूक अत्यंत थरारक दिसतोय. अफझल खानच्या भूमिकेसाठी संजय दत्तने परिधान केलेली वेशभूषा अत्यंत प्रभावी आणि साजेशी वाटत आहे. 'खलनायक' म्हणून नेहमीच छाप सोडणाऱ्या संजय दत्तला अशा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. संजय दत्तनं यापूर्वीही 'अग्निपथ' आणि 'केजीएफ २' सारख्या चित्रपटांमध्ये नकारात्मक आणि क्रूर भूमिकांमध्ये आपली छाप पाडून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील संघर्ष हा मराठा इतिहासातील सर्वात महत्त्वाचा अध्याय आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी विजापूरच्या आदिलशाहीचा सरदार अफजल खान आणि शिवाजी महाराजांमध्ये झालेल्या संघर्षात शिवाजी महाराजांनी अफझल खानाला कंठस्नान घातले होते. या दिवसाची आठवण म्हणून आजही महाराष्ट्रात शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.
चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
'राजा शिवाजी' सिनेमाची निर्मिती जिनिलीया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे. अजय-अतुल यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. यात संजय दत्त आणि सलमानशिवाय, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, फरदीन खान, अभिषेक बच्चन, जितेंद्र जोशी, भाग्यश्री अशी स्टारकास्ट आहे. 'राजा शिवाजी' सिनेमा १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. मराठीसोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये सिनेमा रिलीज केला जाणार आहे.