सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये बिग बींची एन्ट्री? 'त्या' फोटोमुळे सुरु झाली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 14:26 IST2025-10-30T14:26:22+5:302025-10-30T14:26:57+5:30
सलमान आणि अमिताभ बच्चन अनेक वर्षांनी एकत्र दिसणार?

सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये बिग बींची एन्ट्री? 'त्या' फोटोमुळे सुरु झाली चर्चा
'दबंग'अभिनेता सलमान खान आगामी 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये दिसणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अपूर्व लाखिया सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. दरम्यान आता अपूर्व लाखिया यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटो शेअर केल्यानंतर वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. अमिताभ बच्चन यांचीही 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये एन्ट्री झाल्याची चर्चा सुरु आहे.
दिग्दर्शक अपूर्व लाखिया 'बॅटल ऑफ गलवान'चे अपडेट्स सोशल मीडियावर अनेकदा शेअर करत असतात. काल त्यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली. अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांचा फोटो होता. 'ते मला काय सांगत आहेत अंदाज लावा' असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलं. तसंच 'लीजेंड ऑन सेट टुडे' असं हॅशटॅग दिलं. यावरुन अमिताभ बच्चन हे 'बॅटल ऑल गलवान'च्या सेटवर आल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला.

फोटोमध्ये अमिताभ बच्चन अपूर्व लाखिया यांना काहीतरी सांगत आहेत आणि लाखिया ऐकताना दिसत आहेत. हा कँडीड फोटो खरंच 'बॅटल ऑफ गलवान'सेटवरचा आहे की आणखी कोणत्या सिनेमाच्या सेटवरचा आहे या गोंधळात चाहते पडले आहेत. पण जर हा 'बॅटल ऑफ गलवान'सेटवरचा असेल तर अनेक वर्षांनी सलमान खान आणि अमिताभ बच्चन एकत्र सिनेमात दिसतील. याआधी दोघंही 'गॉड तुस्सी ग्रेट हो', 'बाबुल', 'बागबान' या सिनेमांमध्ये दिसले आहेत.
'बॅटल ऑफ गलवान' हा चित्रपट १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीनच्या लष्करी संघर्षावर आधारित आहे, जो भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी बनवला जात आहे. या चित्रपटात सलमान खान कर्नल बी. संतोष बाबू यांची भूमिका साकारत आहे. सिनेमा पुढील वर्षी ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे.