'बाजीगर'साठी सलमान होता पहिली पसंती, वडिलांमुळे नाकारली ऑफर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 12:30 IST2026-02-21T12:28:42+5:302026-02-21T12:30:21+5:30
Baazigar: १९९३ मध्ये रिलीज झालेल्या हा सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आहे. मात्र, या सिनेमासाठी शाहरुख पहिली पसंती नव्हता.

'बाजीगर'साठी सलमान होता पहिली पसंती, वडिलांमुळे नाकारली ऑफर?
बॉलिवूडमध्ये ब्लॉकबस्टर ठरलेला सिनेमा म्हणजे 'बाजीगर'. या सिनेमात अभिनेता शाहरुख खानच्या अभिनयाची एक दुसरी बाजू पाहायला मिळाली. आजही या सिनेमातील गाणी आणि संवाद प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. या सिनेमात शाहरुखने केलेल्या अभिनयाचं सर्व स्तरांमधून कौतुक झालं. मात्र, या सिनेमासाठी किंग खान (shahrukh khan) दिग्दर्शकांची पहिली पसंती नव्हता.
१९९३ मध्ये रिलीज झालेल्या हा सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आहे. मात्र, या सिनेमासाठी शाहरुख पहिली पसंती नव्हता. तर, त्याच्याऐवजी अभिनेता सलमान खानला (salman khan) दिग्दर्शकांनी पहिली पसंती दिली होती. परंतु, सलमानने या सिनेमाची ऑफर नाकारली. एका मुलाखतीमध्ये सलमानने या गोष्टीचा खुलासा केला.
सलमानने 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्याकडे 'बाजीगर'ची ऑफर आल्याचं सांगितलं. ''अब्बास मस्तान या सिनेमाची स्क्रिप्ट घेऊन माझ्याकडे आले होते. त्यावेळी मी ती स्क्रीप्ट माझ्या वडिलांना सलीम खान यांना दाखवली. त्यानंतर आम्ही दोघांनी त्यावर चर्चा केली. त्यावेळी आम्हाला ही भूमिका थोडीशी निगेटिव्ह वाटली. या सिनेमात खलनायक नव्हता. परंतु, नायकालाच खलनायकाची भूमिका साकारायची होती. त्यामुळे मी हा सिनेमा करण्यास नकार दिला'', असं सलमानने सांगितलं.
पुढे सलमान म्हणाला, ''त्यावेळी माझ्या वडिलांनी अब्बास मस्तान यांना सिनेमात आईचा भूमिका आणखी उठावदार करण्याचा सल्ला दिला होता. ज्यामुळे नायकाच्या वाट्याला आलेला निगेटिव्ह रोलचा प्रभाव कमी होईल. मात्र, त्यावेळी अब्बास मस्तान यांनी तो सल्ला ऐकला नाही. परंतु, ज्यावेळी ही भूमिका शाहरुखला ऑफर झाली. त्यावेळी त्यात आईच्या भूमिकेला वेगळा अँगल दिला गेला होता.''
दरम्यान, त्याकाळी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १५ कोटींची कमाई केली होती. तर ३२ कोटी ग्रास कमाई झाली होती. या सिनेमात शाहरुखसोबत काजोल आणि शिल्पा शेट्टीने स्क्रीन शेअर केली होती.