सलमान होणार सासरा! भाईजानच्या भाच्याने केला साखरपुडा; कोण आहे खान कुटुंबाची होणारी सून?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 11:06 IST2026-01-04T11:03:23+5:302026-01-04T11:06:16+5:30
मामाच्या आधी भाचा करणार लग्न! खान कुटुंबात प्रवेश करणारी 'ती' कोण? जाणून घ्या सविस्तर

सलमान होणार सासरा! भाईजानच्या भाच्याने केला साखरपुडा; कोण आहे खान कुटुंबाची होणारी सून?
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या घरात लवकरच सनईचौघडे वाजणार आहेत. सलमानचा भाचा आणि प्रसिद्ध संगीतकार अयान अग्निहोत्रीने आपली मैत्रीण टीना रिझवानी हिच्याशी साखरपुडा केला आहे. अयानने ३ जानेवारी २०२६ रोजी सोशल मीडियावर आपल्या 'ड्रीम प्रपोजल'चे काही रोमँटिक फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.
अयानने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना एक अतिशय मजेशीर कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिले, "२०२५ मध्ये मी माझ्या गर्लफ्रेंडला मागे सोडून आलो आहे." याचा अर्थ आता त्याची गर्लफ्रेंड लवकरच आयुष्यभराची साथीदार होणार आहे. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये टीना आपली हिऱ्याची अंगठी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. एका फोटोमध्ये अयान तिला किस करताना दिसत आहे. एका सुंदर आलिशान व्हिलामध्ये अयान आणि टिनाने साखरपुडा केला आहे.
कोण आहे खान कुटुंबाची होणारी सून?
अयानची होणारी पत्नी टीना रिझवानी ही ग्लॅमर जगापासून पूर्णपणे लांब आहे. ती कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून 'ब्लू ॲडव्हायझरी' मध्ये हेड ऑफ कम्युनिकेशन्स या पदावर ती कार्यरत आहे. तिला बिझनेस मॅनेजमेंट आणि मार्केटिंग क्षेत्रात १० वर्षांहून अधिक अनुभव आहे. विशेष म्हणजे, ती चित्रपटसृष्टीतील नसली तरी सोशल मीडियावर तिचे चांगले फॉलोअर्स आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील तिला फॉलो करतो.
अयानच्या या पोस्टवर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अरबाज खानची माजी पत्नी मलायका अरोरा हिने "यानी आणि टीना" असं म्हणत प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल, सीमा सजदेह, अमृता अरोरा आणि पुलकित सम्राट यांसारख्या कलाकारांनीही या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत.
अयान अग्निहोत्री हा सलमानची बहीण अलविरा खान आणि अभिनेता-निर्माता अतुल अग्निहोत्री यांचा मुलगा आहे. तो एक उत्तम संगीतकार असून 'अग्नी' या नावाने प्रसिद्ध आहे. त्याने सलमान खानसोबत 'यू आर माईन' या गाण्यात काम केले आहे. आता अयान आणि टिना लग्न कधी करणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.