दिग्दर्शक साजिद खानचा अपघात, करावी लागली शस्त्रक्रिया; बहीण फरान खानने दिले हेल्थ अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:54 IST2025-12-29T12:53:31+5:302025-12-29T12:54:27+5:30
फराहने साजिदचा अपघात झाल्याची माहिती दिली आहे. ती म्हणाली...

दिग्दर्शक साजिद खानचा अपघात, करावी लागली शस्त्रक्रिया; बहीण फरान खानने दिले हेल्थ अपडेट
बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान बऱ्याच काळापासून गायब आहे. त्याची कुठेही चर्चा नाही. तर दुसरीकडे त्याची बहीण फराह खान युट्यूब विश्वात नाव कमावत आहे. दरम्यान आता फराह खानने नुकतंच भाऊ साजिदबद्दल अपडेट दिली आहे. साजिदचा अपघात झाला असून त्याच्यावर सर्जरी झाल्याचा खुलासा तिने केला आहे. साजिदच्या पायाला दुखापत झाली असून फ्रॅक्चरही झालं आहे. तो सध्या रुग्णालयात दाखल आहे.
साजिद खानने गेल्या महिन्यात ५५ वा वाढदिवस साजरा केला. बहीण फराह तर यावेळी खूप खूश होती आणि तिने भावाला शुभेच्छा दिल्या. मात्र आता तिने एक माहिती शेअर केली. फराहने साजिदचा अपघात झाल्याची माहिती दिली आहे. ती म्हणाली, "साजिद एकता कपूरच्या एका प्रोजेक्टसाठी शूट करत होता. त्याचवेळी सेटवर त्याचा अपघात झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्याची दुखापत पाहून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. रविवारीच त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. आता तो एकदम बरा आहे. हळूहळू सुधारणा होत आहे."
साजिद खानने 'हमशक्ल', 'हे बेबी', 'हाऊसफुल' सारखे हिट सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. मात्र गेल्या १० वर्षांपासून त्याने एकही सिनेमा बनवलेला नाही. त्याचा शेवटचा सिनेमा 'हमशक्ल' २०१४ साली आला होता. २०१८ साली साजिदवर मीटूचे आरोप लागले होते. त्यानंतर तो 'बिग बॉस १६'मध्ये दिसला होता. मात्र या शोचाही त्याला काहीच फायदा झाला नव्हता.