किआरा की अनीत पड्डा? पडद्यावर कोण साकारणार मधुबाला; 'त्या' चर्चांना यशराज फिल्म्सकडून पूर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 10:30 IST2026-03-11T10:26:12+5:302026-03-11T10:30:28+5:30
सुपरहिट डेब्यूनंतर थेट मधुबाला यांच्या बायोपिकमध्ये झळकणार अनीत पड्डा? अखेर सत्य आलं समोर; किआराला रिप्लेस केल्याची रंगलेली चर्चा

किआरा की अनीत पड्डा? पडद्यावर कोण साकारणार मधुबाला; 'त्या' चर्चांना यशराज फिल्म्सकडून पूर्णविराम
Madhubal Biopic: मधुबाला म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुरेख स्वप्न. स्वप्नच जणू. ती आली, तिने जिंकले आणि ती गेली. सगळयांना चुटपुट लावून. आजही सौंदर्यातील शेवटचा शब्द म्हणजे ‘मधुबाला’च समजला जातो. एकूणच तिचा रूपेरी वावर आजही एक ‘आयडॉल’ समजला जातो. आजच्या पिढीला कदाचित हे वाचून आश्चर्य वाटेल मधुला पडद्यावर पाहतानाच नव्हे तर त्यांच्या उल्लेखानेही रोमांचित होणारे हजारो रसिक होते.गेल्या काही काळापासून प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला यांच्या जीवनावर आधारित बायोपिकबद्दल हिंदी सिनेसृष्टीत सतत चर्चा सुरू आहेत. मात्र, पडद्यावर मधुबाला यांची भूमिका कोण साकारणार याचं उत्तर अद्यापही अनुत्तरीत आहे. गे्ल्या वर्षभरापासून अभिनेत्री किआरा अडवाणी मधुबाला यांच्या भूमिकेत झळकणार असल्याची बातम्या कानावर येत होत्या. मात्र, आता या बायोपिकमध्ये किआरा नव्हे एक नवा चेहरा दिसणार असल्याची माहिती मिळते आहे. नेमकं काय आहे सत्य? जाणून घेऊया...
आपल्या सौंदर्याने आणि सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य करणाऱ्या या नायिकेच्या जीवनावर आधारित चित्रपट बनणार असल्याच्या चर्चा आहेत.विशेष म्हणजे बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साली मधुबाला यांच्या बायोपिकचं दिग्दर्शन करणार असल्याचं म्हटलं जात आहे. याशिवाच चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर त्यामध्ये अभिनेत्री किआरा अडवाणी मधुबाला यांच्या भूमिकेत झळकणार असल्याची बातम्या कानावर येत होत्या. त्यात आता या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट मिळते आहे.
अलिकडेच काही रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की मधुबाला यांच्या भूमिकेसाठी किआरा नव्हेतर अभिनेत्री अनीत पड्डाचं नाव फायनल करण्यात आलं आहे. परंतु, या सगळ्या अफवा असल्याचं यशराज फिल्म्सकडून सांगण्यात येत आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, या सगळ्या अफवा असून याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. चित्रपटात अनित पड्डाला कास्ट केल्याचे दावे खोटे आहेत, असं यशराज फिल्म्सकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे मधुबाला यांची भूमिका पडद्यावर कोण साकारणार ही माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, अनित पड्डाने यापूर्वी शक्ती शालिनी या चित्रपटात कियारा अडवाणीला रिप्लेस केलं होतं. वृत्तानुसार, कियारा अडवाणी सुरुवातीला शक्ती शालिनी मध्ये काम करणार होती, परंतु तिच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तिने या प्रोजेक्टमधून माघार घेतली.
त्यानंतर अनित पड्डाला त्या भूमिकेसाठी कास्ट करण्याल आलं.