डोक्यावर कर्जाचा डोंगर, ४ वर्षांची मेहनत पुराच्या पाण्यात वाहून गेली; आज आहे प्रसिद्ध अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 13:15 IST2025-08-03T13:10:59+5:302025-08-03T13:15:26+5:30
अभिनय सोडून शेतीची कास धरली अन् झाला कर्जबाजारी! प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला कठीण काळ

डोक्यावर कर्जाचा डोंगर, ४ वर्षांची मेहनत पुराच्या पाण्यात वाहून गेली; आज आहे प्रसिद्ध अभिनेता
Saiyaara Actor Rajesh Kumar: मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. १८ जुलै २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला असून जगभरात ४०४ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. अनित पड्डा व अहान पांडे यांची प्रमुख भूमिका असलेला सैयारा ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय. त्याचबरोबर चित्रपटातील इतर कलाकारांच्या कामाचंही कौतुक होतंय. याचनिमित्ताने चित्रपटात अभिनेत्री अनीत पड्डाच्या वडिलांची भूमिका साकारणारा अभिनेता राजेश कुमार चर्चेत आला आहे. दरम्यान, अभिनय सोडून गावाकडे शेती करण्यासाठी राजेश कुमार रमला होता. याबद्दल त्याने एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
राजेश कुमार 'साराभाई वर्सेस साराभाई', 'एक्सक्यूज मी मॅडम' यांसारख्या मालिकांसाठी ओळखला जातो. त्याने अनेक हिंदी मालिकांसह चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. मात्र, एक वेळ अशी आली जेव्हा अभिनेत्याला काम मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याने इंडस्ट्रीला रामराम करत शेती करण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने त्यावर भाष्य केलं आहे. त्यादरम्यान, अभिनेता म्हणाला, "माझ्या हातात कामच नव्हतं. पैसे जात होते, उत्पन्नाचे मार्ग बंद झाले होते. शिवाय ज्या काही किंमती वस्तू होत्या त्या विकण्याची वेळ आली होती. मी कर्जबाजारी झालो होतो. "
पुढे अभिनेता म्हणाला, "माझ्यावर २ कोटी रुपयाचं कर्ज झालं होतं. उदरनिर्वाहासाठी देखील कमावणं अवघड झालेलं. माझ्या आयुष्यातील तो सगळ्यात कठीण का होता, त्यावेळी एकवेळच्या जेवणासाठीही खिशात पैसे उरले नव्हते. या दरम्यान माझ्या कुटुंबीयांची मला साथ मिळाली.सगळे ठामपणे पाठिशी उभे राहिले." असा खुलासा अभिनेत्याने मुलाखतीत केला.
राजेश कुमारने पालघरमध्ये १७ एकर जमीन विकत घेत तिथे शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यादरम्यान, त्याला असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागलं. चार वर्षे मेहनत करुन पुराच्या पाण्यात त्याने लावलेली झाडे वाहून गेली होती. शिवाय त्याची शेती देखील जळून गेली होती. असे वाईट अनुभव अभिनेत्याच्या वाट्याला आले.