सैफ-अक्षयच्या 'हैवान' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण; मराठी अभिनेत्री दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 16:45 IST2025-12-08T16:45:07+5:302025-12-08T16:45:46+5:30
प्रियदर्शन दिग्दर्शित आणि अक्षय कुमार, सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या 'हैवान' या आगामी हिंदी चित्रपटाची बरीच चर्चा आहे

सैफ-अक्षयच्या 'हैवान' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण; मराठी अभिनेत्री दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत!
दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या आगामी 'हैवान' या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि सैफ अली खान हे मुख्य भूमिकेत आहेत. या मल्टी-स्टारर प्रोजेक्टमध्ये मल्याळम चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार मोहनलालदेखील काम करणार आहे. शिवाय या चित्रपटात एक मराठी अभिनेत्री झळकणार असल्याने चाहत्यांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाचे शूटिंग अखेर पूर्ण झाले आहे. खुद्द प्रियदर्शन आणि सैफ अली खान यांनी सेटवर केक कापून रॅप-अपचा आनंद साजरा केला.
हा चित्रपट जाहीर झाल्यापासून तो चर्चेत होता, याचे मुख्य कारण म्हणजे या चित्रपटातून बॉलिवूडची आयकॉनिक जोडी अक्षय कुमार आणि सैफ अली खान हे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तब्बल १८ वर्षांनंतर 'हैवान' या चित्रपटातून पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. अक्षय कुमार आणि सैफ अली खानने यापूर्वी 'मैं खिलाड़ी तू अनाड़ी', 'ये दिल्लगी', 'तू चोर मैं सिपाही', 'कीमत' आणि 'टशन' अशा चित्रपटांत एकत्र काम केले आहे. 'टशन' हा त्यांचा एकत्रितपणे केलेला शेवटचा चित्रपट होता.
'हैवान' या चित्रपटात सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबतच श्रिया पिळगावकर आणि सायामी खेर यांसारख्या प्रभावी कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. उत्कृष्ट दिग्दर्शक आणि तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहनलाल या चित्रपटात कॅमिओ भूमिकेत दिसणार आहेत. 'हैवान'मध्ये सैफ अली खान एका अंध व्यक्तीची भूमिका साकारत आहे, तर अक्षय कुमार खलनायकाच्या भूमिकेत आहे.