"पोलिसांनी माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं"; आकाश कनौजियाच्या वडिलांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:59 IST2025-01-29T13:58:50+5:302025-01-29T13:59:15+5:30
Saif Ali Khan : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातील संशयित म्हणून छत्तीसगडमधील दुर्ग येथून ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे.

"पोलिसांनी माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं"; आकाश कनौजियाच्या वडिलांचा गंभीर आरोप
मुंबईतील सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातील संशयित म्हणून छत्तीसगडमधील दुर्ग येथून ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असं म्हटलं आहे. १८ जानेवारी रोजी रेल्वे संरक्षण दलाने दुर्ग स्थानकावर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-कोलकाता शालीमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधून आकाश कनौजियाला ताब्यात घेतलं.
१९ जानेवारी रोजी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिक शरीफुल फकीरला अटक केल्यानंतर दुर्ग आरपीएफने कनौजियाला सोडलं. आकाशचे वडील कैलाश कनौजिया म्हणाले, "मुंबई पोलिसांनी माझ्या मुलाला त्याची ओळख पटवल्याशिवाय ताब्यात घेतलं. या चुकीमुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. आता आकाश मानसिक आघातामुळे कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि तो त्याच्या कुटुंबाशी जास्त बोलत नाही. त्याची नोकरी गेली आणि त्याचं लग्नही मोडलं. याला जबाबदार कोण? पोलिसांच्या वृत्तीमुळे आकाशचं भविष्य उद्ध्वस्त झालं आहे."
"एका चुकीमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं"
आकाश कनौजिया याआधी म्हणाला होता की, जेव्हा मीडियाने माझे फोटो दाखवायला सुरुवात केली तेव्हा माझ्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मुंबई पोलिसांच्या एका चुकीमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मला मिशा आहेत हे त्यांच्या लक्षात आलं नाही आणि अभिनेत्याच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीला मिशा नव्हत्या.
"माझी नोकरी गेली आणि माझं लग्न मोडलं"
आकाशने दावा केला की, घटनेनंतर मला पोलिसांचा फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की मी कुठे आहे? मी घरी असल्याचं त्यांना सांगितलं तेव्हा फोन कट झाला. मी माझ्या होणाऱ्या बायकोला भेटण्यासाठी जात असताना मला दुर्गमध्ये ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर रायपूरला नेण्यात आलं. तिथे पोहोचलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकानेही मला मारहाण केली. या घटनेनंतर माझे आयुष्य बदललं. माझी नोकरी गेली आणि माझं लग्न मोडलं.