समान शरीरयष्टी असलेल्या १० जणांमधून सैफच्या स्टाफ नर्सनं आरोपीला ओळखलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 14:50 IST2025-02-06T14:48:09+5:302025-02-06T14:50:09+5:30
सैफच्या स्टाफ नर्स या जीवघेणा हल्ला प्रकरणातील मुख्य साक्षीदार आहेत.

समान शरीरयष्टी असलेल्या १० जणांमधून सैफच्या स्टाफ नर्सनं आरोपीला ओळखलं का?
Saif Ali Khan Attack: बॉलिवूडच्या बड्या स्टार्सपैकी एक असलेल्या सैफ अली खानवर त्याच्याच घरी घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आला. अभिनेत्यावर हल्ला केल्यानंतर १९ जानेवारी रोजी पोलिसांनी ठाणे येथून मोहम्मद शरीफुल इस्लाम (३०) याला अटक केली होती. सुरुवातीला अटकेतील आरोपी आणि हल्लेखोर वेगळा असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता हल्ला झाला त्यावेळी उपस्थित असलेल्या सैफच्या स्टाफ नर्स अरियामा फिलिप आणि जुनू यांनी आरोपीला ओळखलंय. बुधवारी मुंबई पोलिसांनी आरोपीच्या ओळख परेडसाठी या दोन्ही नॅनींना बोलावण्यात आलं होतं.
सैफचा धाकटा लेक जहांगीरची काळजी घेणारी नर्स अलियामा फिलिप (५६) आणि घरगुती मदतनीस जुनू बुधवारी आर्थर रोड तुरुंगात पोहचल्या. यावेळी शरीफुल इस्लामची ओळख परेड काढण्यात आली. शरीफुलला इतर कैद्यांसोबत दोघींसमोर उभे करण्यात आलं. समान शरीरयष्टी असणाऱ्या आरोपीसारख्या इतर नऊ जणांना रांगेत उभं करण्यात आलं होतं आणि नॅनी फिलिपला आरोपीची ओळख पटवण्यास सांगितलं गेलं. यावेळी दोघींनीही त्याची ओळख पटवली. तहसीलदार आणि पाच स्वतंत्र पंचांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.फिलिप ही या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आहे. कारण तिच्यावरही आरोपीने हल्ला केला होता.
आरोपीचा चेहरा ओळख (फेस रेकग्निशन) अहवाल सकारात्मक आल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांनी अटक केलेला आरोपी आणि हल्लेखोर एकच असल्याचा दावा करण्यात येत आहे. आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी जवळपास ४६० सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केल्याची माहिती आहे. शरीफुलच्या हाताच्या ठशाचे नमुने आणि घटनास्थळावरील हल्लेखोराच्या बोटांच्या ठशांशी जुळत नसल्याच्या आरोपावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे फेस रेकग्निशन अहवाल महत्त्वाचा ठरलाय. गुन्हा सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडे अन्यही तांत्रिक पुरावे आहेत. यात सीसीटीव्ही फुटेज (जे मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेले नाही), मोबाईल लोकेशन आणि आयपीडीआर (इंटरनेट प्रोटोकॉल तपशील अहवाल) यांचा समावेश आहे.