पराठा, पाण्याच्या बाटलीनं रहस्य उलगडलं, एक चूक घडली अन् पोलिसांनी चाकू हल्ला करणाऱ्या शहजादला पकडलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:42 IST2025-01-20T13:42:27+5:302025-01-20T13:42:42+5:30
भारतात आल्यानंतर त्याने आपले नाव बदलून विजय दास असे केले होते...

पराठा, पाण्याच्या बाटलीनं रहस्य उलगडलं, एक चूक घडली अन् पोलिसांनी चाकू हल्ला करणाऱ्या शहजादला पकडलं!
अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी रविवारी शरीफुल इस्लाम शहजादला अटक केली आहे. तो मुळचा बांगलादेशी नागरिक आहे. तो गेल्या पाच महिन्यांहूनही अधिक काळापासून मुंबईत राहत होता. भारतात आल्यानंतर त्याने आपले नाव बदलून विजय दास असे केले होते. मुंबई पोलिसांनी कसून शोध घेतल्यानंतर त्याला ठाणे जिल्ह्यातून अटक केली.
UPI ट्रांझेक्शनच्या आधारे शहजादपर्यंत पोहोचले पोलीस -
आता अनेकाना प्रश्न पडला आहे की, पोलीस शहजादपर्यंत पोहोचले कसे? मिळालेल्या माहितीनुसार, UPI ट्रांझॅक्शिननुसार मुंबई पोलीस चाकू हल्ला करणाऱ्यापर्यंत पोहोचले. UPI ट्रांझॅक्शनच्या माध्यमाने शहजादचा मोबाईल क्रमांक पोलिसांच्या हाती लागला. नंबर ट्रेस केल्यानंतर पोलिसांना शहजादचे लोकेशनची माहिती मिळाली. यानंतर, 100 हून अधिक पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानूसार, पोलीस एका भागात शोध घेत होते. मात्र, शोध घेतल्यानंतर ते निघत असताना त्यांना एक व्यक्ती झोपलेली दिसली. जेव्हा एक अधिकारी त्या व्यक्ती जवळ गेला, तेव्हा तो उठला आणि पळू लागला. यानंतर पोलिसांनी त्याला पकडले.
श्रमिक ठेकेदाराने मुंबई पोलिसांना हल्लेखोरापर्यंत पोहोचवले -
एका कामगार ठेकेदाराने मुंबई पोलिसांना शरीफुल इस्लाम शहजादपर्यंत पोहोचण्यास मदत केली. तपासादरम्यान, पोलिसांना आढळून आले की, आरोपी दादर रेल्वे स्थानकाबाहेर तीनवेळा दुसून आला, तो वरळी कोळीवाड्यातही गेला होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि हल्लेखोर त्या परिसरातील एका कामगार ठेकेदाराकडे गेल्याचेही त्यांना आढळून आले.
आरोपीने पराठे खाल्ल्यानंतर केलं होतं यूपीआय ट्रांझॅक्शन -
कामगार कंत्राटदाराने (ठेकेदार) हल्लेखोरासंदर्भात पोलिसांना सर्व माहिती दिली आणि त्या आधारे, पोलिसांनी त्याचा ठाणे जिल्ह्यातील एका कामगार छावणीतून पकडले. आरोपीने यापूर्वी ठाण्यातील एका हॉटेलमध्ये काम केले आहे आणि आतापर्यंत त्याचे कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. आरोपीने पराठे आणि पाण्याच्या बाटलीचे पैसे UPI द्वारे दिले होते, अशी माहिती संबंधित कंत्राटदारानेच पोलिसांना दिली होती.