'तू आहेस तशीच...' सई ताम्हणकरची क्रिती सेननसाठी खास पोस्ट, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 11:55 IST2023-07-27T11:54:46+5:302023-07-27T11:55:42+5:30
क्रिती सेनन आज ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.

'तू आहेस तशीच...' सई ताम्हणकरची क्रिती सेननसाठी खास पोस्ट, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
2021 साली आलेला अभिनेत्री क्रिती सेननचा (Kriti Sanon) 'मिमी' प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. मराठी सिनेमा 'मला आई व्हायचंय'चा तो हिंदी रिमेक होता. 'मिमी' मध्ये क्रिती सेननच्या अभिनयाचं भरभरुन कौतुक झालं. शिवाय मराठमोळ्या अभिनेत्रीनेही सिनेमात लक्ष वेधून घेतलं होतं. अभिनेत्री सई ताम्हणकरने (Saie Tamhankar) सिनेमात क्रितीच्या जवळच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. आज क्रितीच्या वाढदिवसानिमित्त सई ताम्हणकरने खास पोस्ट केली आहे.
क्रिती सेनन आज ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त सई ताम्हणकरने दोघींचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो 'मिमी' चित्रपटावेळचा आहे. सईने क्रितीला शुभेच्छा देत लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा सुंदरी! कधीच थांबू नको, जशी आहेस तशीच राहा, कारण तू मनानेही खूप सुंदर आहेस. खूप खूप प्रेम. '
मिमी सिनेमात सई आणि क्रितीची जोडी खूपच पसंत केली गेली होती. क्रिती सोबतच सईच्याही अभिनयाचं कौतुक झालं होतं. सईला या सिनेमासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. सई ताम्हणकर हळहळू बॉलिवूडमध्येही आपला डंका गाजवत आहे. या फोटोतून तिची आणि क्रितीची मैत्री दिसून येते.