'सन ऑफ सरदार २' मध्ये मी संजय दत्तच्या जागी आलो कारण..., रवी किशन यांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 14:39 IST2025-07-21T14:38:34+5:302025-07-21T14:39:40+5:30
अजयचा मला फोन आला, म्हणाला, 'यार, संजू बाबाचा...'; रवी किशन यांनी सगळंच सांगितलं

'सन ऑफ सरदार २' मध्ये मी संजय दत्तच्या जागी आलो कारण..., रवी किशन यांनी केला खुलासा
अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार २' (Son Of Sardaar 2) लवकरच प्रदर्शित होणार आहे. २०१२ साली आलेल्या 'सन ऑफ सरदार'चा हा सीक्वेल आहे. सिनेमात अजय देवगणसोबतसंजय दत्तचीही (Sanjay Dutt) भूमिका होती. मात्र सीक्वेलमध्ये संजय दत्त दिसत नाही. त्याच्या जागी अभिनेते रवी किशन (Ravi Kishan) यांना घेण्यात आलं. तसंच सोनाक्षीच्या ऐवजी मृणाल ठाकूरची एन्ट्री झाली आहे. संजय दत्त न दिसण्याचं कारण आता रवी किशन यांनी स्वत:च सांगितलं आहे.
'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये या प्रश्नाचं उत्तर देताना रवी किशन म्हणाले, " एक दिवस अजय देवगणचा फोन आला आणि त्याने विचारलं, 'रवी, काय करतोय?' मी म्हणालो, 'काही नाही, बोला'. तर तो म्हणाला, 'यार, सन ऑफ सरदारमध्ये संजू बाबा येणार होते पण काही कारणाने त्यांचा व्हिसा रिजेक्ट झाला आहे. तर तू करशील?'. मी खूश झालो."
ते पुढे म्हणाले, "संजय दत्त कल्ट माणूस आहे आणि त्याच्या जागी मला घेतलं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मला आणखी एक सांगायचंय ते म्हणजे सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये सहसा फोकस हिरोवर असतो मात्र अजयने या सिनेमात माझ्याही भूमिकेला क्लायमॅक्समध्ये तेवढंच वजन दिलं आहे."
नंतर कपिलने अजयला विचारलं, 'संजय दत्त पंजाबी आहे आणि रवीजी युपीचे, मग तरी त्यांना घ्यायचं कसं डोक्यात आलं?' यावर अजय म्हणाला, "आम्ही त्यांचं कॅरेक्टर त्याच हिशोबाने ठेवलं आहे. यांच्या वडिलांना तीन पत्नी आहेत-एक पंजाब, एक बिहार आणि एक लंडन. तर रवीचं कॅरेक्टर बिहारचं आहे."
'सन ऑफ सरदार २' २५ जुलै रोजी रिलीज होणार होता. मात्र आता तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. सिनेमा १ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. 'सैय्यारा' सिनेमाची सध्या प्रेक्षकांमध्ये क्रेझ असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.