'कांतारा' नक्कल प्रकरणात रणवीर सिंहच्या अडचणी संपेना! 'या' मंदिराला भेट देऊन पश्चात्ताप करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 15:13 IST2026-04-11T15:10:39+5:302026-04-11T15:13:44+5:30
रणवीर सध्या यशाच्या शिखरावर असला तरी एका जुन्या वादाने त्याची पाठ सोडलेली नाही. गे

'कांतारा' नक्कल प्रकरणात रणवीर सिंहच्या अडचणी संपेना! 'या' मंदिराला भेट देऊन पश्चात्ताप करणार
Ranveer Singh Kantara Controversy : बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह सध्या त्याच्या 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने जागतिक स्तरावर तब्ब १७०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. रणवीर सध्या यशाच्या शिखरावर असला तरी एका जुन्या वादाने त्याची पाठ सोडलेली नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 'कांतारा' चित्रपटातील दैवी पात्राची नक्कल केल्याप्रकरणी रणवीर कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. या प्रकरणी रणवीरनं रणवीर नुकतेच कर्नाटक उच्च न्यायालयाला कळवले आहे की, तो या प्रकरणात नव्याने माफीनामा दाखल करण्यास तयार आहे.
काल १० एप्रिल रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान, रणवीरचे वकील साजन पूवैया यांनी स्पष्ट केले की, रणवीरला आपल्या कृतीचा मनापासून पश्चात्ताप होत आहे. रणवीरने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, "मी मुंबईत राहतो आणि एका सिंधी कुटुंबातून येतो. त्यामुळे दक्षिण भारतातील या परंपरेच्या संवेदनशीलतेची मला पूर्ण जाणीव नव्हती. भक्तांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता".
चामुंडी देवीच्या चरणी नतमस्तक होणार!
रणवीरने केवळ शब्दांनी माफी मागितली नाही, तर आपल्या श्रद्धेचे दर्शन घडवण्यासाठी म्हैसूरमधील ऐतिहासिक चामुंडी देवी मंदिराला भेट देण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. "मी योग्य वेळी मंदिरात जाऊन प्रार्थना करेन आणि माझी भक्ती व्यक्त करेन," असे त्याने न्यायालयात सांगितले. न्यायालयाने त्याची ही विनंती मान्य करत या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.
रणवीर काय बोलून गेलेला?
नोव्हेंबर २०२५ मध्ये गोव्यात झालेल्या इफ्फी (IFFI) सोहळ्यात रणवीरनेही हजेरी लावली. त्याच्या 'धुरंधर' सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो आला होता. यावेळी त्याने समोर बसलेल्या ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा'ची स्तुती केली. ऋषभच्या अभिनयाचीही स्तुती केली. मात्र त्याने देवीच्या जागी भूत असा उल्लेख केला आणि ऋषभची नक्कलही केली. ज्यावर आता लोक भडकले. त्यानंतर रणवीरविरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत 'हाय ग्राउंड्स' पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. आता या नव्या माफीनाम्यामुळे वादाला पूर्णविराम मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.