पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 14:46 IST2025-12-10T14:46:31+5:302025-12-10T14:46:58+5:30
'धुरंधर'मध्ये पाकिस्तानातील राजकारण आणि तेथील बराचसा परिसरही दाखवण्यात आला आहे. पण, याचं शूटिंग खरंच पाकिस्तानात झालंय का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असलेल्या 'धुरंधर' सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. 'धुरंधर' सिनेमातून पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेरांची कहाणी दाखवण्यात आली आहे. रणवीर सिंगने साकारलेला भारतीय गुप्तहेर ओळख बदलून हमजा अली मझारी बनून पाकिस्तानातील कराचीमधील लयारीमध्ये राहत तिथला कुख्यात गुंड असलेल्या रहमान डकैतच्या गँगमध्ये सामील होतो. आणि त्याच्या गुप्त कारवायांची माहिती भारताला देतो. 'धुरंधर'मध्ये पाकिस्तानातील राजकारण आणि तेथील बराचसा परिसरही दाखवण्यात आला आहे. पण, याचं शूटिंग खरंच पाकिस्तानात झालंय का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.
'धुरंधर'मध्ये दाखवलेला मोहल्ला हा पाकिस्तानातच असल्यासारखा वाटतो. याशिवाय सिनेमाचं बहुतांश कथानक हे पाकिस्तानात घडत असल्याचं दाखवल्याने शूटिंगही तिथेच झाल्याचं बोललं जात होतं. याबाबत आता खुद्द 'धुरंधर' फेम अभिनेत्याच केला आहे. 'धुरंधर'मध्ये रहमान डकैतच्या भावाची भूमिका साकारलेल्या दानिश पंडोरने याचा खुलासा केला आहे. फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत दानिश म्हणाला, "असं काहीच नाहीये. सिनेमाचं शूटिंग पाकिस्तानात झालेलं नाही. पाकिस्तानात काहीही शूट केलेलं नाही. बँकॉकमध्ये काही भाग शूट झालाय. आणि बाकीचा सिनेमा भारतातच शूट केलाय".
"सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आदित्य सरांनी तिकडच्या लोकांचं जीवन या सिनेमात दाखवलं आहे. तिथे गँगस्टर कसे होते आणि त्यांना कसं मोठं केलं गेलं, अशा अनेक गोष्टी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे", असंही दानिशने पुढे सांगितलं. दानिशच्या 'धुरंधर'मधील भूमिकेलाही चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. या सिनेमामुळे तो चर्चेत आला आहे. 'धुरंधर'मध्ये रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, आर माधवन, अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य धरने केलं आहे. ५ डिसेंबरला 'धुरंधर' प्रदर्शित झाला होता. आत्तापर्यंत सिनेमाने १५० कोटींचा गल्ला जमवला आहे.