"राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात माझ्या मुलीला..."; राणी मुखर्जीने व्यक्त केली खंत, काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 13:43 IST2025-09-27T13:40:29+5:302025-09-27T13:43:27+5:30
नुकताच राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान मिळालेल्या राणी मुखर्जीने तिच्या मनातील खंत व्यक्त करुन मुलीबद्दल खास गोष्ट सांगितली आहे

"राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात माझ्या मुलीला..."; राणी मुखर्जीने व्यक्त केली खंत, काय म्हणाली?
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीला नुकताच तिच्या 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे हा सोहळा पार पडला. राणीने या खास समारंभासाठी गळ्यात एक सोन्याचा पेंडन्ट घातला होता, ज्यावर तिची मुलगी 'आदिरा'चे नाव कोरलेले होते. हा साधा पण भावनिक क्षण चर्चेचा विषय ठरला. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मुलीला सोबत घेऊन जाण्याची राणीची खूप इच्छा होती. पण राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील एका महत्वाच्या नियमामुळे तिला मुलीला घेऊन जाता आलं नाही.
राणी मुखर्जीने व्यक्त केली खंत
राणीने नुकतंच इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत मुलीला घेऊन का जाता आलं नाही, याचा खुलासा केला. राणीने सांगितलं की, ''आदिराची या पुरस्कार सोहळ्याला हजर राहण्याची खूप इच्छा होती. माझ्या खास दिवशी माझ्यासोबत यायला मिळावं यासाठी ती खूप रडत होती. मात्र आम्हाला सांगण्यात आलं की, १४ वर्षांखालील मुलांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याची परवानगी नसते. या नियमामुळे आदिराचा हिरमोड झाला. त्यामुळेच मला तिला सोबत घेऊन जाता आलं नाही.''
As a Ranian, I literally had tears in my eyes seeing Rani Mukerji receiving her long-overdue National Award! #RaniMukerji#NationalFilmAwards#71stNationalFilmAwards#MrsChatterjeeVsNorway#Ranianpic.twitter.com/bHvyHxtmXI
— MURTUZA IQBAL (@MurtuzIqbal) September 23, 2025
राणीने लेकीला दिलं 'हे' खास वचन
लेकीची नाराजी दूर करण्यासाठी राणीने एक खास उपाय केला. तिने आदिराला सांगितले, "तू माझ्यासोबत नसलीस तरी मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईन." हे वचन पूर्ण करण्यासाठीच राणीने तिच्या गळ्यात आदिराचे नाव असलेला पेंडन्ट घातला.
राणी म्हणाली, "आदिरा माझी लकी चार्म आहे. मला तिला माझ्यासोबत न्यायचं होतं आणि हे करण्यासाठीचा हा सर्वात सोपा आणि जवळचा मार्ग होता." पुरस्कार स्वीकारतानाही आदिरा तिच्या हृदयाजवळ होती, असं राणीने सांगितलं.
पुरस्कार मिळाल्यानंतर राणीने सोशल मीडियावर व्हायरल झालेले आदिराच्या नावाच्या पेंडन्टचे फोटो आणि व्हिडिओ आदिराला दाखवले. राणीच्या या खास आणि भावनिक कृतीने आदिराचा आनंद द्विगुणित झाला आणि तिचं रडणं शांत झालं. आपल्या आईच्या इतक्या मोठ्या विजयात आदिरा प्रत्यक्ष नसली तरी, आईच्या प्रेमाने ती त्या क्षणाची साक्षीदार झाली.