रणबीर कपूरच्या सीक्रेट इन्स्टाग्राम अकाउंटवर आहेत २ रील्स, कोणते? आलिया भटचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:51 IST2025-11-13T15:51:04+5:302025-11-13T15:51:41+5:30
आलियालाही फॉलो करु दिलं नाही कारण..., रणबीर कपूरने दिलं उत्तर

रणबीर कपूरच्या सीक्रेट इन्स्टाग्राम अकाउंटवर आहेत २ रील्स, कोणते? आलिया भटचा खुलासा
रणबीर कपूर आणि आलिया भट बीटाऊनमधलं सर्वात चर्चेतलं आणि क्युट कपल आहे. नुकतेच दोघं दुबईतील एका इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. या इव्हेंटमध्ये रणबीरने 'बद्तमीज दिल' या त्याच्या गाजलेल्या गाण्यावर डान्स केला. तर आलियाने 'झूमका' गाण्यावर ठुमका लगावला. तसंच 'गंगूबाई काठियावाडी'चा डायलॉगही म्हणून दाखवला. दरम्यान आलियाने रणबीरच्या सीक्रेट इन्स्टाग्राम अकाउंटबद्दलचाही खुलासा केला.
इव्हेंटमध्ये रणबीरला 'तू सोशल मीडियावर का नाहीस?' असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा रणबीर म्हणाला,"माझं एक सीक्रेट अकाउंट आहे जे फेक आहे आणि ते प्रायव्हेट आहे. फक्त इतरांचं कंटेंट बघण्यासाठी मी या अकाउंटचा वापर करतो. जगात असे कित्येक लोक आहेत जे चांगलं काम करतात आणि मी त्यांचंच अकाउंट फॉलो करण्यासाठी इन्स्टाग्राम बघतो."
तो पुढे म्हणाला, "मी अभिनेता आहे. जर मी माझं खरं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केलं तर माझ्यावर ते जगासमोर आणण्याची आणि सर्वांना प्रत्येक गोष्ट दाखवण्याची जबाबदारी येईल. मला वाटतं लोकांशी जोडून राहण्यासाठी इन्स्टाग्रामची गरज नाही. माझ्याजवळ आधीपासूनच एक माध्यम आहे जे की सिनेमा आहे. सिनेमातूनच मी चाहत्यांशी जोडलेला राहतो."
रणबीरनंतर आलियाने लगेच माईक घेतला आणि म्हणाली की,'रणबीरच्या सीक्रेट अकाउंटवर फक्त दोनच रील्स आहेत आणि दोन्हीमध्ये तो राहासोबत खेळताना दिसत आहे.' यावर रणबीर गंमतीत म्हणाला, 'गेल्या दहा वर्षांपासून मला हाच प्रश्न विचारण्यात येतो त्यामुळे प्रत्येक वेळी मी वेगवेगळी उत्तरं देतो. तसंच माझे शून्य फॉलोअर्स आहेत. मी आलियालाही मला फॉलो करु दिलेलं नाही. एकदा का तिने मला फॉलो केलं की मग सगळ्यांनाच कळेल की ते माझं अकाऊंट आहे.'