बोनी कपूर यांनी केलं रणबीरच्या संयमाचं कौतुक; म्हणाले, "५२ रिटेक्स केले त्यावेळी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 10:41 IST2025-09-05T10:40:26+5:302025-09-05T10:41:16+5:30
सिनेमात बोनी कपूर यांनी रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

बोनी कपूर यांनी केलं रणबीरच्या संयमाचं कौतुक; म्हणाले, "५२ रिटेक्स केले त्यावेळी..."
अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या दमदार अभिनयाचं चाहते आणि क्रिटिक्सकडून नेहमीच स्तुती होते. तसंच रणबीरच्या शिस्तीचं, संयमाचंही कायम कौतुक होतं. नुकतंच निर्माते बोनी कपूर यांनी रणबीरच्या संयमाचा किस्सा सांगितला आहे. उन्हातान्हात किंवा रात्री कितीही वेळ शूट असू दे आणि कितीही रिटेक्स होऊ दे रणबीर चकारही काढत नाही. बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी सांगितलेला किस्सा वाचा
रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा २०२३ साली 'तू झुठी मै मक्कार' सिनेमा आला होता. बोनी कपूर यांनी रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली होती. कोमल नाहटा यांना दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर म्हणाले, "रणबीर असा एकमेव कलाकार आहे ज्याला मी सेटवर कधीही कंटाळताना पाहिलं नाही. आम्ही सलग १६ तास शूट करत होतो. दिल्लीतल्या उकाड्यात शूट केलं. नंतर त्याऐवजी रात्री शूट करायचं ठरवलं. रात्री ९ ते सकाळी ६ असं आम्ही शूट करायचो. कारण तेव्हा जरा कमी उकाडा असायचा. या सगळ्यात रणबीरने एक सेकंदासाठीही नाराजी दाखवली नाही. तो खरंच प्रोफेशनल आहे."
ते पुढे म्हणाले, "मला आठवतंय एका सीनवेळी ५२ रिटेक्स झाले. वेगवेगळ्या कारणामुळे सतत रिटेक होत होते. पण रणबीरने सर्व क्रू मेंबर्सचा आदर केला. काहीही न बोलता, न चिडता तो रिटेक देत होता. माझ्याच एका शॉटमध्ये १३-१४ रिटेक झाले तेव्हा मी गोंधळून गेलो होतो. तेव्हा रणबीर आला आणि म्हणाला मी ५२ रिटेक दिले. जोपर्यंत दिग्दर्शकाचं समाधान होत नाही तुम्हाला काम करावंच लागेल. त्याच्या संयमाची खरोखर दाद द्यायला हवी. सेटवर तो कायम आनंदी असायचा."