रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:59 IST2026-04-09T13:55:52+5:302026-04-09T13:59:33+5:30
'रामायण' बाबतीत नितेश तिवारींचा मोठा खुलासा

रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण'चा पहिला पार्ट येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचं भरघोस बजेट आणि स्टारकास्टमुळे याची जोरदार चर्चा आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीराम आणि साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत आहे. तर रावणाच्या भूमिकेत साउथ सुपरस्टार यश आहे. सिनेमातून रावण म्हणजे यश फक्त व्हिलन म्हणून दिसणार नाही. तर रावणाची दुसरी बाजूही सिनेमातून पाहायला मिळणार आहे.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नितेश तिवारी म्हणाले, "रावणाच्या आयुष्याचे अनेक पैलू होते. तो एक महान योद्धा, कुशल संगीतकार, एक विद्वान, एक दयाळु राजा आणि बरंच काही होता. तो महान शिवभक्तही होता हे तर सर्वांना माहितच आहे. त्यामुळे रावणाची भूमिका ही केवळ खलनायकाची नसून त्याची दुसरी बाजूही यातून बघायला मिळेल."
ते पुढे म्हणाले, "रावणाचे सर्व पैलू दाखवणं गरजेचंच आहे कारण यात मोठी शिकवण दडलेली आहे. सगळ्यांमध्येच हे सर्व चांगले गुण असू शकतात पण जर तुमच्या बदला घेण्याची भावना किंवा गर्व असेल तर शेवटी याचा काय परिणाम होतो हे तुम्हाला माहितच असेल."
याआधीही एका मुलाखतीत नितेश तिवारी म्हणाले होते की ते अयोध्या आणि लंकेला अशा प्रकारे स्क्रीनवर दाखवणार आहेत जे याआधी प्रेक्षकांनी पाहिलं नसेल. रामायणाचं बजेट ४ हजार कोटी रुपये आहे अशीही चर्चा झाली होती,. सिनेमाची जगभरात चर्चा आहे. नुकतीच याची पहिली झलक समोर आली. आता सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.