"बॉलिवूडचे काही लोक त्यांचं अपयश पाहायला उत्सुक..."; राम गोपाल वर्मा यांनी 'धुरंधर' जोडीबद्दल व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 16:58 IST2026-03-14T16:57:25+5:302026-03-14T16:58:10+5:30
नुकतेच राम गोपाल वर्मांनी 'धुरंधर' चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धर आणि त्याची पत्नी अभिनेत्री यामी गौतम यांचे भरभरून कौतुक केले आहे. मात्र, कौतुक करतानाच त्यांनी या धुरंधर जोडीला एक गंभीर इशाराही दिला आहे

"बॉलिवूडचे काही लोक त्यांचं अपयश पाहायला उत्सुक..."; राम गोपाल वर्मा यांनी 'धुरंधर' जोडीबद्दल व्यक्त केली चिंता
प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे आपल्या रोखठोक मतांसाठी ओळखले जातात. नुकतेच त्यांनी 'धुरंधर' चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धर आणि त्याची पत्नी अभिनेत्री यामी गौतम यांचे भरभरून कौतुक केले आहे. मात्र, कौतुक करतानाच त्यांनी या 'धुरंधर' जोडीला एक गंभीर इशाराही दिला आहे, ज्यामुळे चित्रपटसृष्टीत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
आदित्य धरच्या दिग्दर्शनाचे कौतुक
राम गोपाल वर्मा यांनी आदित्य धरच्या कामाची स्तुती करताना म्हटले की, आदित्यने ज्या पद्धतीने भारतीय सिनेमात 'गुन्हेगारी विश्व' (Crime World) पडद्यावर मांडले आहे, ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.'' आदित्यच्या कथा सांगण्याच्या शैलीने अनेक दिग्दर्शकांना विचार करायला भाग पाडले आहे. त्यामुळे आता ठराविक चौकटीच्या बाहेर येऊन काहीतरी नवीन विचार त्यांना करावा लागेल," असे वर्मा म्हणाले.
केवळ आदित्यच नाही, तर यामी गौतमच्या अभिनयाचेही रामू यांनी कौतुक केले. यामीचा अलीकडेच आलेला कोर्टरूम ड्रामा 'हक' मधील तिचा अभिनय त्यांना खूप आवडला. या यशामुळेच इंडस्ट्रीतील काही लोक या दोघांवर जळतात, असं राम गोपाल वर्मा यांनी नमूद केले. ते म्हणाले, "बॉलिवूडमधील अनेक लोक आदित्यच्या यशाने अस्वस्थ आहेत. चित्रपटसृष्टीतील काही मंडळी या दोघांचं अपयश पाहण्यासाठी टपून बसले आहेत. त्यामुळे या दोघांनी भविष्यात खूप जपून पावलं उचलण्याची गरज आहे."
रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला ब्लॉकबस्टर चित्रपट 'धुरंधर'चा दुसरा भाग म्हणजेच 'धुरंधर २' येत्या १९ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीच मोठी उत्सुकता आहे. त्यातच मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामी गौतम देखील या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजते, ज्यामुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.