भारत 'धुरंधर' आहे की 'टॉक्झिक'? राम गोपाल वर्मांना १९ मार्चची प्रतीक्षा, दोन्ही सिनेमांवर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 16:49 IST2026-02-22T16:48:51+5:302026-02-22T16:49:32+5:30
राम गोपाल वर्मांची भलीमोठी पोस्ट, 'धुरंधर'चं पारडं जड?

भारत 'धुरंधर' आहे की 'टॉक्झिक'? राम गोपाल वर्मांना १९ मार्चची प्रतीक्षा, दोन्ही सिनेमांवर म्हणाले...
येत्या १९ मार्च रोजी भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे. 'धुरंधर २' आणि 'टॉक्सिक' हे दोन बिग बजेट पॅन इंडिया चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याने बॉक्स ऑफिसवर मोठा संघर्ष अटळ आहे. ईदच्या मुहूर्तावर येणाऱ्या या चित्रपटांकडे सिनेसृष्टीतील दिग्गजांचे लक्ष लागले असून, प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी यात उडी घेत आदित्य धर यांच्या 'धुरंधर २' ला पाठिंबा दिला आहे.
राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहीत या क्लॅशवर आपले परखड मत मांडले आहे. त्यांनी आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक करताना म्हटले की, 'धुरंधर २' प्रेक्षकांच्या बुद्धिमत्तेचा आदर करणारा चित्रपट आहे, तर 'टॉक्सिक' प्रेक्षकांना कमी लेखतो. वर्मा यांच्या मते, हा लढा केवळ दोन चित्रपटांचा नसून दोन वेगळ्या प्रकारच्या सिनेमांच्या विचारसरणीचा आहे, ज्यामुळे चित्रपट वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
THE #Dhuroxic PARK
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) February 22, 2026
NO, I am not talking about TWO BIG FILMS #Dhurandhar2 and #Toxic releasing on March 19th. I am actually talking about a NEVER BEFORE SEEN or EXPERIENCED mythical archetype EXPLODING in the GRAND ARENA of INDIAN CINEMAS.
It is a BATTLE between DAVID AND GOLIATH…
कन्नड सुपरस्टार यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटाची सध्या प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. 'केजीएफ २' च्या तुफान यशानंतर हिंदी पट्ट्यातही यशचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला असून या चित्रपटाच्या टीझरने आधीच धुमाकूळ घातला आहे. दुसरीकडे, 'धुरंधर'चा पहिला भाग हिंदीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक असल्याने, त्याचा सिक्वेल पहिल्या भागापेक्षाही मोठा व्यवसाय करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या दोन्ही चित्रपटांची स्टारकास्ट अत्यंत तगडी असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'टॉक्सिक'मध्ये यशसोबत कियारा आडवाणी, नयनतारा आणि हुमा कुरेशी यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत, तर 'धुरंधर २' मध्ये रणवीर सिंगसोबत संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. १९ मार्चला जेव्हा हे दोन सिनेमे एकमेकांसमोर उभे ठाकतील, तेव्हा बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.