'रोशन' कुटुंबाची मोठी गुंतवणूक! एकाच इमारतीत खरेदी केले पाच कार्यालय, किती कोटी मोजले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 15:13 IST2025-11-25T15:12:58+5:302025-11-25T15:13:48+5:30
रोशनच कुटुंबाची करोडोंची खरेदी; पाच कार्यालयांसाठी मोजली मोठी रक्कम

'रोशन' कुटुंबाची मोठी गुंतवणूक! एकाच इमारतीत खरेदी केले पाच कार्यालय, किती कोटी मोजले?
Rakesh Roshan Buy Property : अनेक बॉलिवूड स्टार रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत आहेत. आता अभिनेता हृतिक रोशनचे वडील आणि बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माते रोशन रोशन यांनी रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. राकेश रोशन यांनी मुंबईत तब्बल पाच मालमत्ता खरेदी केल्या आहेत. ज्याचा करार हा कोट्यवधींच्या घरात झाला आहे. या पाचही मालमत्तांची एकूण किंमत सुमारे १९.६८ कोटी रुपये आहे.
अंधेरी ईस्टमधील वैद्य वेस्ट वर्ल्ड वन एरोपोलिस या इमारतीत तब्बल पाच कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी केल्या आहेत. राकेश रोशन यांनी खरेदी केलेली ही कार्यालये इमारतीच्या आठव्या मजल्यावर आहेत. रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म ‘स्क्वेअर यार्ड्स’ (Square Yards) ने नोंदणी महानिरीक्षक (IGR) येथील कागदपत्रांच्या आधारावर ही माहिती दिली आहे. या सर्व मालमत्तांचे व्यवहार नोव्हेंबर २०२५ मध्ये नोंदवले गेले आहेत. पाच ऑफिस युनिट्सचा ७,५०० चौरस फूट रेरा कार्पेट आणि १० कार पार्किंग जागा आहेत. मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, पाच ऑफिस युनिट्ससाठी भरलेले एकूण नोंदणी शुल्क १.५० लाख आणि १.१८ कोटींहून अधिक स्टॅम्प ड्युटी आहे.
राकेश रोशन यांची पहिली मालमत्ता ही ३,२७ कोटी रुपयांची आहे. ज्याचा रेरा कार्पेट एरिया १,२५९ चौरस फूटचा आहे. या व्यवहारात १९ लाख ६४ हजार रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरावे लागले. विशेष म्हणजे या करारात कारसाठी दोन पार्किंगची जागा देण्यात आली आहे. तर दुसऱ्या मालमत्तेसाठी २ कोटी ८३ लाख मोजले आहेत. याचा रेरा कार्पेट एरिया १,०८९ चौरस फूट आहे. या व्यवहारात १६ लाख ९८ हजार रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरावे लागले. या करारातही कारसाठी दोन पार्किंग जागा देण्यात आली आहे.
राकेश यांच्या पत्नी प्रमिला रोशन यांच्या नावावर तिसरी मालमत्ता खरेदी करण्यात आली आहे. ४.८५ कोटी रुपयांच्या या मालमत्तेमध्ये १,८६९ चौरस फूट रेरा कार्पेट एरिया आहे. या करारातही दोन पार्किंग जाग आहेत. या करारासाठी २०.१५ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरावे लागले.
५.२८ कोटींच्या चौथ्या मालमत्तेत २,०३३ चौरस फूट रेरा कार्पेट एरिया आहे. दोन कार पार्किंग जागेसोबत या व्यवहारात ३१.७१ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरावे लागले आहे. तर पाचवी मालमत्ता ही ३.४३ कोटींना खरेदी केली आहे. या मालमत्तेचा रेरा कार्पेट एरिया हा १,३२२ चौरस फूट आहे. या करारासाठी २०.६२ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरावे लागले. या मालमत्तेसोबत दोन कारसाठीची पार्किंग जागा मिळाली आहे.