"आपल्या देशातून हे कायमचं संपवून टाकूया", राजकुमार रावची संतप्त पोस्ट, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 14:26 IST2025-10-29T14:01:38+5:302025-10-29T14:26:25+5:30
राजकुमार राव त्याच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

"आपल्या देशातून हे कायमचं संपवून टाकूया", राजकुमार रावची संतप्त पोस्ट, म्हणाला...
अभिनेता राजकुमार रावबॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणताही 'गॉडफादर' नसताना त्याने आपली मेहनत आणि अभियन कौशल्याच्या बळावर प्रसिद्धी मिळवली आहे. राजकुमार राव याने अभिनयातील विविध पैलू दाखवत प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे. हेच कारण आहे की, त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरही राजकुमार राव नेहमीच सक्रीय असतो. वेगवेगळ्या विषयांवर तो नेहमीच व्यक्त होत असतो. आताही राजकुमार राव त्याच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे. छत्तीसगडच्या रायपूरमधील हुंडाबळी प्रकरणावर राजकुमार रावनं संताप व्यक्त केला आहे.
छत्तीसगडमधील रायपूर शहरात हुंडापीडित २३ वर्षीय मनीषा गोस्वामी हिने आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी मनीषाने एक भावनिक व्हिडीओ रेकॉर्ड केला, ज्यामध्ये तिने आपला पती आणि सासरच्या मंडळींवर सतत शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला. या घटनेनंतर राजकुमार रावने या प्रकरणावर आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनीषा गोस्वामीचा आत्महत्येपूर्वीचा व्हायरल व्हिडीओ राजकुमार रावने त्याच्या सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर शेअर केला आणि या घटनेला 'खूप दुःखद बातमी' म्हटले. अभिनेत्याने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "खूप दुःखद बातमी. आता आपल्या देशातील या भयानक प्रथेचा अंत करण्याची वेळ आली आहे. चला आपण एकमेकांना ही वाईट प्रथा टाळण्यासाठी प्रेरित करूया. हुंडा घेण्याला नाही म्हणूया".

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मनीषाचे लग्न अवघ्या १० महिन्यांपूर्वी जानेवारीमध्ये झाले होते. लग्नानंतर लगेचच तिच्या सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू झाला. या छळामुळे मनीषा पूर्णपणे खचून गेली होती आणि तिने टोकाचे पाऊल उचलले. आपल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये मनीषाने तिची वेदना व्यक्त करताना म्हटले आहे की, "मी माझ्या भावंडांमध्ये सर्वात मोठी आहे आणि माझे वडील एकमेव कमावते आहेत. मी माझ्या सासरच्या लोकांच्या वागण्याला कंटाळली आहे. माझ्या लग्नाला १० महिने झाले आहेत, पण मला १० दिवसही आनंद मिळाला नाही". दरम्यान, मनीषाच्या मृत्यूनंतर, तिच्या वडिलांनी तातडीने डीडी नगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन मनीषाचा पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.