"शिल्पाचं नाव मध्ये आणू नका..." अश्लील व्हिडिओ केस प्रकरणी राज कुंद्राने सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 14:08 IST2024-12-17T14:07:51+5:302024-12-17T14:08:17+5:30
राज कुंद्राने तीन वर्षांनंतर सोडलं मौन; म्हणाला, 'कुटुंबातील सदस्यांसाठी बोलणार...'

"शिल्पाचं नाव मध्ये आणू नका..." अश्लील व्हिडिओ केस प्रकरणी राज कुंद्राने सोडलं मौन
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि पती राज कुंद्रा (Raj Kundra) वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. पोर्नोग्राफी केस प्रकरण, ईडीची धाड यामुळे ते सतत बातम्यांमध्ये असतात. अश्लील कंटेंट बनवल्याप्रकरणी राज कुंद्राची अजूनही चौकशी सुरु असून प्रकरण कोर्टात आहे. दरम्यान नुकतंच राज कुंद्राने एका मुलाखतीत पत्नी शिल्पा आणि मुलांना या चर्चांपासून दूर ठेवा असं वक्तव्य केलं आहे.
बिझनेसमन आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने ANI ला मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला, "गेल्या तीन वर्षांपासून मीडिया माझ्याबद्दल अनेक तर्क वितर्क लावत आहे. खरं म्हणजे मी शांत राहणं हेच कधीकधी बेस्ट होतं. पण जेव्हा गोष्ट कुटुंब आणि कुटुंबातील सदस्यांची येते तेव्हा मला वाटतं की मी समोर येऊन बोललं पाहिजे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. ज्या १३ जणांवर आरोपपत्र आहे त्यात मी एकमेव असा व्यक्ती आहे जो हे प्रकरण लवकरात लवकर संपावं असं म्हणतोय. जर कोणी दोषी असेल तर त्याच्यावर आरोप लावा आणि दोषी नाही त्याची निर्दोष मुक्तता करा. मी जर १ टक्का सुद्धा दोषी असतो तर माझ्या सुटकेची मागणी केली नसती. मला न्याय हवा आहे आणि गेल्या ३ वर्षांपासून मी यासाठी लढा देतोय. मला ६३ दिवस आर्थर रोड तुरुंगात ठेवलं गेलं. कुटुंबाशिवाय ६३ दिवस राहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. जसं की मी सांगितलं मी कोर्टात या प्रकरणी लढा देत आहे आणि मी ही केस जिंकेन असा मला पूर्ण विश्वास आहे."
तो पुढे म्हणाला, "शिल्पा शेट्टीने इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे. तिने यासाठी मेहनत घेतली आहे. जर हे प्रकरण माझ्याबद्दल आहे तर यात माझ्या पत्नीचं नाव आणणं हे चुकीचं आहे. तिचं नाव टाकलं की क्लिकबेट मिळतं म्हणून मीडिया नेहमी तिचं नाव टाकते. शिल्पा शेट्टीचा नवरा असं म्हटलं तर जास्त व्ह्यूज मिळतात. पण यामध्ये तुम्ही त्या व्यक्तीची प्रतिमा मलीन करत आहात. मी फक्त तिचा पती आहे. तुम्ही माझ्याकडे या. मी इथे १५ वर्षांपासून आहे. आयपीएल टीमचा मालक ते बिझनेसमन, मी भारतात मोठी गुंतवणूक केली आहे. मी इथून कुठेही जाणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे एखाद्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणं चुकीचं आहे. तुम्हीही माझ्याबद्दल कितीही बोलू शकता पण माझ्या कुटुंबाबद्दल नाही."