'Raid 2'नंतर चर्चेत रितेश देशमुख; टीका-ट्रोलिंगला दिलं उत्तर, वडिलांचा सल्ला ठरला मार्गदर्शक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 10:19 IST2025-05-04T10:19:33+5:302025-05-04T10:19:52+5:30
रितेश देशमुखनं जागवली विलासराव देशमुखांबाबतची आठवण

'Raid 2'नंतर चर्चेत रितेश देशमुख; टीका-ट्रोलिंगला दिलं उत्तर, वडिलांचा सल्ला ठरला मार्गदर्शक
Riteish Deshmukh News: राजकुमार गुप्ता दिग्दर्शित 'रेड २' (Raid 2) चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. आज ४ मे पर्यंत सिनेमानं धुवांधार कमाई केली आहे. आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भुमिकेत असेलल्या अजय देवगण (Ajay Devgn) याला दादा मनोहर भाई या खलनायकाच्या भूमिकेतून अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने जोरदार टक्कर दिली आहे.अजय आणि रितेश यांच्या अभिनयाची खास जुगलबंदी 'रेड २'मध्ये पाहायला मिळतेय. अशातच आता रितेश देशमुखनं होणाऱ्या टीका आणि ट्रोलिंगवर स्पष्ट मत मांडलं. यासोबत त्याने वडिलांची आठवण काढत, त्यांनी दिलेल्या महत्वपूर्ण सल्ल्याबद्दल सांगितलं.
नुकतंच रितेश देशमुखनं बॉलिवूड बबलला मुलाखत दिली. यावेळी रितेशनं जेव्हा तो फिल्मी जगतात आला होता, तेव्हा त्याला वैयक्तिक टीकेचा सामना करावा लागल्याचं सांगितलं. रितेश म्हणाला, "मला टीकेबद्दल कधीच काही समस्या नव्हती. पण जेव्हा टीकाकार हे वैयक्तिक पातळीवर टीका करतात, त्याचा मला त्रास होतो. जेव्हा मी इंडस्ट्रीत नवीन होतो, तेव्हा माझ्यावर एकदा अशी टीका करण्यात आली होती की, रितेश चित्रपटात फर्निचरच्या दुकानातील लाकडासारखा होता. तर एका म्हटलं होतं की, एका सीनमध्ये मी डोळे सारखे मिचकावत होतो, तर आणखी एकाने म्हटलं होतं की, रितेश चित्रपटात ट्यूबलाइट वाटत होता. पण, मला याबद्दल काही समस्या नाही. कारण या टीका मला काही तरी शिकवूनच जातात. पण वैयक्तिक टिपण्णी मला खटकते".
रितेश देशमुख त्याला जीवनात मिळालेल्या यशाचं श्रेय वडील विलासराव देशमुख यांना देत असतो. आताही रितेश देशमुखने वडिलांविषयीच्या आठवणी जागवल्या. रितेश म्हणाला, "माझ्या वडिलांनी मला तेव्हा खूप छान गोष्ट सांगितली होती. त्यांनी मला विचारलं होतं की, "तुझं काम काय आहे?" त्यावर मी "अभिनय करणं" असं उत्तर दिलं होतं. मग त्यांनी मला विचारलं की, "त्यांचं काय काम आहे?" मग मी म्हटलं की "आम्ही जे काम करतो त्यावर टिपण्णी करणं". तर ते म्हणाले होते की, "मग त्यांना त्यांचं काम करुदे. तू तुझं तुझं काम कर आणि पुढे जा". वडिलांनी तो सल्ला दिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी माझ्या कामावर लक्ष देणं गरजेचं आहे. मी कामात नावीन्य आणि विविधता आणण्याचा प्रयत्न करेन. त्या कामातून माझ्या टीकाकारांना मी उत्तर देईन. त्यामुळे आता मला त्याचा इतका त्रास होत नाही आणि त्रास झाला तरी आपण सगळेच सोशल मीडियावर आहोत, तर कुणीही वैयक्तिक टिपण्णी केली तरी आम्ही काय करणार आहोत", असं रितेशनं म्हटलं.