बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 09:41 IST2025-05-16T09:39:46+5:302025-05-16T09:41:37+5:30

राहुल गांधी यांनी चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

Rahul Gandhi Watches Phule Cinema In City Centre Mall At Patna During Bihar Tour | बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...

बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...

Rahul Gandhi Watch Phule Cinema: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे १५ मे २०२५ रोजी बिहारच्या दौऱ्यावर होते. गुरुवारी दुपारी दरभंगा येथील आंबेडकर वसतिगृहात 'शिक्षा न्याय संवाद' कार्यक्रमाला संबोधित केल्यानंतर ते पाटणामधील सिटी सेंटर मॉलमध्ये पोहोचले. यावेळी ४०० सामाजिक कार्यकर्त्यांसोबत राहुल गांधींनी समाजसुधार महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित 'फुले' चित्रपट पाहिला. 'फुले' चित्रपट पाहिल्यानंतर राहुल गांधी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. 

राहुल गांधींनी सोशल मीडियावर  चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यासंदर्भात फोटो शेअर केले आहेत. यासोबतच त्यांनी लिहलं,"आज बिहार दौऱ्यादरम्यान, पाटणा येथील आयनॉक्स मॉलमध्ये राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांसोबत 'फुले' हा चित्रपट पाहिल्यानंतर मी भावुक झालो. शिक्षण, समानता आणि न्यायाचा मार्ग सोपा नाही. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जीवन, संघर्ष आणि आदर्शच आज आपल्या समाजाला आणि देशाला या मार्गावर मार्गदर्शन करू शकतात", या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


'फुले' चित्रपट पाहिल्यानंतर राहुल गांधी दुपारी ४.५६ वाजता थिएटरमधून बाहेर आले आणि विमानतळाकडे रवाना झाले. राहुल गांधी यांच्या या भेटीने सामाजिक न्याय आणि शिक्षणाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं असून बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

दरम्यान, 'फुले' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी काही वाद निर्माण झाले होते. चित्रपटावर आरोप करण्यात आला होता की, त्यामध्ये ब्राह्मण समाजाबद्दल चुकीची माहिती दर्शवली आहे. या कारणास्तव, सेंसर बोर्डाने चित्रपटात काही बदल करण्याची मागणी केली होती, ज्यामध्ये जातिव्यवस्थेवरील व्हॉइसओव्हर काढून टाकणे आणि काही संवाद व दृश्यांमध्ये बदल करण्याचा समावेश होता. या चित्रपटात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.  चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केले आहे. 

 

Web Title: Rahul Gandhi Watches Phule Cinema In City Centre Mall At Patna During Bihar Tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.