"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 11:01 IST2025-12-12T11:00:58+5:302025-12-12T11:01:46+5:30
माझ्या मुलांना या वातावरणात कसं वाढून जिथे अशा प्रकारचं मनोरंजन होत आहे...

"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
मराठी, हिंदी आणि हॉलिवूड मध्ये सक्रीय असलेली अभिनेत्री राधिका आपटे. राधिकाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. सध्या ती लेकीच्या पालनपोषणात आणि संसारात व्यग्र आहे. पती बेनेडिक्ट टेलरसोबत ती लंडनमध्येच स्थायिक आहे. फक्त कामासाठी राधिका लंडनला येते. नुकतंच राधिकाने आजकालच्या सिनेमात दाखवण्यात येणाऱ्या हिंसक कंटेंटवर नाराजी व्यक्त केली आहे.
'द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया'शी बोलताना राधिका आपटे म्हणाली, "सध्या मनोरंजनाच्या नावाखाली हिंसा विकली जात आहे हे पाहून मी खरंच खूप दु:खी आहे. मला अगदी मनमोकळेपणाने सांगायचंय की मला हे पाहून अक्षरश: त्रास होतोय. मी माझ्या मुलीला अशा वातावरणात वाढवू शकत नाही जिथे या प्रकारचं मनोरंजन असेल. मी हे सहन करु शकत नाही. आज पडद्यावर दाखवण्यात येणारी क्रूरता ही अतिशय विचलित करणारी आहे."
ती पुढे म्हणाली, "फिल्ममेकर उगाचच मर्यादा पार करत आहेत आणि भयावह सीन्सच्या माध्यमातून कथा सांगत आहेत. जर मला कोणा अशा व्यक्तीची कथा सांगायची आहे जो लोकांचे तुकडे तुकडे करतो, तर मला त्याच्या त्या भयावह गोष्टी पाहण्याची गरज वाटत नाही. हे गोष्ट सांगणं होत नाही. मी असं कधीच पाहिलं नाही. समाजावर याचा मोठा प्रभाव पडत आहे आणि याच गोष्टी विकल्या जात आहेत याचंही मला दु:ख होतंय. कोरोनानंतर इंडस्ट्रीत गोष्टीऐवजी तमाशाच जास्त दिसतोय. जिथे केवळ खळबळ माजवली जात आहे. क्रिएटर्सने आता हे समजून घ्यायला हवं."
राधिका आगामी 'साली मोहोब्बत' सिनेमात दिसणार आहे. आजपासून सिनेमा झी५ वर रिलीज होत आहे. टिस्का चोप्राने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'इफ्फी' आणि शिकागो साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमाचं कौतुक झालं आहे.