सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 18:12 IST2025-10-25T18:11:35+5:302025-10-25T18:12:42+5:30
आर माधवनने सतीश शाह यांच्या आठवणीतला एक गोड फोटो शेअर करत लिहिले...

सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
विनोदी अभिनेते सतीश शाह यांचं आज किडनीच्या विकाराने निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. सर्वांना हसवणाऱ्या अभिनेत्याने अचानक एक्झिट घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. सतीश शाह यांनी अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलं. त्यांच्यासोबत ज्यांनी स्क्रीन शेअर केली त्यांच्या अनेक आठवणी आहेत. त्यांच्या निधनाने त्या सर्वच सहकलाकारांना धक्का बसला आहे. अभिनेता आर माधवनेही सतीश शाह यांच्यासोबत काम केलं होतं. आता त्याने भावुक पोस्ट लिहिली आहे.
आर माधवनने सतीश शाह यांच्यासोबतच्या आठवणीतला एक गोड फोटो शेअर केला आहे. यामध्ये मंदिरा बेदीही दिसत आहे. तो लिहितो, "आता स्वर्गात उत्साहाचं आणि आनंदी वातावरण असेल. सतीश जी, देव त्याच्या स्वत:च्याच निर्मितीचं कौतुक करुन हसतो. माझ्या करिअरच्या सुरुवातीला तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात त्यासाठी तुमचे खूप आभार. माझ्यावरचा तुमचा विश्वास अढळ होता आणि तुम्ही मला सतत प्रोत्साहन देत राहिलात. तुमची खूप आठवण येईल. सतीश जी तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्या जाण्याने कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. तुमच्या आत्म्याला शांती मिळो. तुमच्याशिवाय आम्ही कसे जगणार...ओम शांती"ॉ
आर माधवनने सतीश शाह यांच्यासोबत 'घर जमाई' ही मालिका केली होती. १९९७ साली म्हणजेच २८ वर्षांपूर्वी ही मालिका ऑन एअर आली होती. अतिशय विनोदी अशी ही मालिका होती. सतीश शाह यांनी यामध्ये विश्वंभर मेहराची भूमिका साकारली होती. तर आर माधवन एम सुब्रमणियमची भूमिका केली होती. मंदिरा बेदीही मालिकेत होती. तसंच अभिनेते असरानी ज्यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं तेही या मालिकेचा भाग होते. आर माधवन आणि सतीश शाह यांच्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं.