रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये शूर्पणखाच्या भूमिकेत दिसली असती प्रियंका चोप्रा; 'या' कारणामुळे नाकारला प्रोजेक्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:39 IST2025-06-12T11:35:34+5:302025-06-12T11:39:09+5:30
बिग बजेट 'रामायण' चित्रपटाची प्रियंका चोप्राला मिळालेली ऑफर; 'या' अभिनेत्रीने केलं रिप्लेस

रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये शूर्पणखाच्या भूमिकेत दिसली असती प्रियंका चोप्रा; 'या' कारणामुळे नाकारला प्रोजेक्ट
Priyanka Chopra : सध्या हिंदी सिनेसृष्टीत नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण 'या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु आहे. या मल्टिस्टारर चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) माता सीतेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याशिवाय अरूण गोविल राजा दशरथाची भूमिका साकारणार आहे. तसेच बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता कैकयीची भूमिका तर केजीएफ स्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल सतत नवीन माहिती समोर येत आहे. त्यात आता बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) देखील या चित्रपटाचा भाग असणार होती, अशी माहिती समोर येत आहे. परंतु काही कारणास्तव या गोष्टी घडल्या नाहीत.
मीडिया रिपोर्टनुसार , बहुचर्चित 'रामायण'सिनेमात निर्मात्यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्रालाही कास्ट करायचं ठरवलं होतं. त्यासाठी प्रियांकाला संपर्क साधण्यात आला होता. परंतु, अभिनेत्रीच्या बिझी शेड्यूलमुळे तिला या प्रोजेक्टचा भाग होता आलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 'रामायण' मध्ये प्रियंका चोप्राला शूर्पणखाची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र, आता तिच्या जागी अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला कास्ट करण्यात आलं आहे. शूर्पणखाच्या भूमिकेसाठी रकुलचं नाव फायनल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
कधी होणार प्रदर्शित?
'रामायण' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, या सिनेमासाठी प्रेक्षकांना तब्बल २ वर्ष वाट पाहावी लागणार आहे. २०२६ मध्ये रामायण सिनेमाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२६च्या दिवाळीमध्ये 'रामायण : भाग १' प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच 'रामायण : भाग २' २०२७च्या दिवाळीमध्ये प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.