Video: प्रियंका चोप्राच्या पतीलाही पडली 'धुरंधर'च्या गाण्याची भुरळ! निक जोनासने भावांसह केला भन्नाट डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:18 IST2025-12-19T12:08:27+5:302025-12-19T12:18:52+5:30
प्रियंका चोप्राचा पती निक जोनासनेही धुरंधरच्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे

Video: प्रियंका चोप्राच्या पतीलाही पडली 'धुरंधर'च्या गाण्याची भुरळ! निक जोनासने भावांसह केला भन्नाट डान्स
'धुरंधर' सिनेमाचं संगीत आणि गाण्यांची क्रेझ आता केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकांच्या मनावर या गाण्यांनी अधिराज्य गाजवलं आहे. ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्राचा पती आणि प्रसिद्ध हॉलिवूड गायक निक जोनासलाही 'धुरंधर'च्या गाण्यांची भुरळ पडली आहे. निक आणि त्याच्या भावंडांनी आपल्या कॉन्सर्टपूर्वी 'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपटातील 'शरारत' या गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
निकचा 'शरारत' गाण्यावर भन्नाट डान्स
निक जोनासने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो, त्याचा भाऊ जो आणि केविन जोनास यांनी स्टेजवर जाण्यापूर्वी 'शरारत' गाण्यावर धमाल डान्स केलेला दिसत आहे. या तिघांची एनर्जी आणि गाण्याशी असलेले त्यांचं ट्युनिंग पाहून चाहते थक्क झाले आहेत. निकने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे की, हे गाणे आता त्यांच्या 'प्री-शो रुटीन'चा एक भाग बनले आहे. म्हणजेच शो ला जाण्यापूर्वी ते या गाण्यावर डान्स करुन एनर्जी मिळवतात. मग पुढे स्टेजवर परफॉर्म करतात.
'देसी जिजू'ची सोशल मीडियावर चर्चा
निक जोनासची अशा प्रकारे बॉलिवूड गाण्यावर डान्स करण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच त्याने 'वॉर २' चित्रपटातील 'आवाँ जावां' या गाण्यावरही ठेका धरला होता. निकचे भारतीय संस्कृती आणि संगीतावर असलेलं हे प्रेम पाहून भारतीय चाहते भारावून गेले आहेत. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी त्याला प्रेमाने 'देसी जिजू' असे संबोधले आहे.
'धुरंधर'बद्दल थोडक्यात
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाचा पूर्ण म्युझिक अल्बम ग्लोबल म्युझिक चार्टमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. एखाद्या हिंदी चित्रपटाच्या सर्व गाण्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाच वेळी इतकी मोठी ओळख निर्माण करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे. रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांची मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर आणि सोशल मीडियावर आपल्या अॅक्शन आणि संगीतामुळे जोरदार चर्चेत आहे.