डान्स करतांना प्रभुदेवाला आला होता पॅरालिसिसचा झटका, उमेदीच्या काळात डान्सरचं करिअर होतं दावणीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:18 IST2026-04-03T12:18:01+5:302026-04-03T12:18:35+5:30
Prabhu deva: प्रभुदेवा एका सिनेमासाठी डान्सचं शुटिंग करत होते. हे शुटिंग सुरळीत सुरु होतं. मात्र, डान्स करता करता अचानक त्यांना पॅरलिसिसचा झटका आला.

डान्स करतांना प्रभुदेवाला आला होता पॅरालिसिसचा झटका, उमेदीच्या काळात डान्सरचं करिअर होतं दावणीला
कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर इंडस्ट्रीत त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे प्रभुदेवा. उत्तम नृत्यकौशल्यामुळे प्रभुदेवाला इंडियन मायकल जॅक्सन असं म्हटलं जातं. बॉलिवूडसह टॉलिवूडमध्येही त्याच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत. विशेष म्हणजे नृत्यकौशल्यामुळे खासकरुन ओळखल्या जाणाऱ्या प्रभुदेवासोबत डान्स करतांना एक अघटित प्रसंग घडला होता. ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता.
प्रभुदेवा एका सिनेमासाठी डान्सचं शुटिंग करत होते. हे शुटिंग सुरळीत सुरु होतं. मात्र, डान्स करता करता अचानक त्यांना पॅरलिसिसचा झटका आला. ज्यामुळे ते जोरात जमिनीवर कोसळले. त्यांची ही अवस्था पाहून सेटवर उपस्थित सगळेच घाबरले. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.
मांसपेशी आकुंचन पावल्यामुळे प्रभुदेवाला त्रास झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. परंतु, तो काळ प्रभुदेवासाठी फार जोखमीचा होता. कारण, एका डान्सरला त्यांच शरीर हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि, जर शरीरानेच साथ दिली नाही तर त्याच्या जीवनातील अर्थच निघून जातो, अशी काहीशी प्रभुदेवाची परिस्थिती झाली होती मात्र, योग्य उपचार आणि काळजी घेतल्यामुळे प्रभुदेवा या त्रासातून बाहेर पडला.
दरम्यान, प्रभुदेवाचे वडीलदेखील एक डान्स टिचर होते. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच घरातून कलेचा वारसा मिळाला. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं. त्यानंतर मेहनतीच्या जोरावर त्यांनी बॅकग्राऊंड डान्सर ते कोरिओग्राफर असा प्रवास केला. कोरिओग्राफर असण्यासोबतच आज ते अभिनेता आणि दिग्दर्शकदेखील आहेत. वॉटेंड सारख्या सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे.