ही सात जन्माची साथ! परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा अखेर लग्नबंधनात अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 19:56 IST2023-09-24T19:09:54+5:302023-09-24T19:56:39+5:30
राजस्थानच्या उदयपूरमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला.

Parineeti Chopra-Raghav Chadha
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा अखेर आज लग्नबंधनात अडकले. राजस्थानच्या उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये मोठ्या धुमधडाक्यात हा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. दोघांनी कुटुंबातील सदस्यांच्या साक्षीने फेरे घेतले. एखाद्या जागतिक सोहळ्याप्रमाणे परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती.
परिणीतीच्या पाठवणीवेळी 'रे कबीरा मान जा' हे गाणे वाजवल्याचे एका व्हिडीओत ऐकायला येत आहे. आता रात्री ८.३० ते ९ च्या दरम्यान लीला पॅलेसमध्ये नवीन जोडप्याचं रिसेप्शन पार पडणार आहे.
परिणीती आणि राघव यांच्या विवाहविधींना दुपारी सुरुवात झाली होती. सेहरा बांधल्यानंतर राघव चड्ढा हे वरात घेऊन लीला पॅलेसमध्ये परिणीती चोप्राकडे पोहचले. याचाही एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे. यात राघव चढ्ढा यांच्या वरातीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तर पंजाबचे मुख्यमंत्री भगंवत मान सिंग दिसत आहेत.
मनीष मल्होत्राने त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर परिणीती आणि राघव यांच्या लग्नातील त्यांच्या लुकचा फोटो शेअर केला.
तर सानिया मिर्झाची धाकटी बहीण अनम मिर्झानेही इन्स्टास्टोरीवर आपला लूक शेअर केलाय.
दरम्यान, शनिवारी संध्याकाळी या दोघांचा संगीत कार्यक्रम पार पडला होता. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
राघव आणि परिणीती यांच्या लग्न सोहळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, मनीष मल्होत्रा, सानिया मिर्झा यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. परिणीती-राघवच्या शाही लग्नात चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. नव जोडप्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. या विवाह सोहळ्यासाठी चाहते गेल्या काही दिवसांपासून उत्साहीत होते. आपल्या आवडत्या सेलिब्रेटींवर गेल्या दोन दिवसांपासून चाहते सोशल मीडियावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
परिणीती आणि राघव चढ्ढांची लव्हस्टोरी एकदम खास आहे. दोघांची पहिली भेट विदेशात झाली. परिणीती चोप्रा यूकेमधील मँचेस्टर विद्यापीठात व्यवसाय, अर्थशास्त्र आणि वित्त विषयात पदवी अभ्यासक्रम करत होती. राघव चढ्ढाही त्याच वेळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत होते आणि दोघांची ओळख तिथेच झाली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले.
जेव्हा परिणीती एका चित्रपटाचे शूटिंग करत होती आणि राघव तिथे पोहोचले होते. परिणीती पंजाबमध्ये होती आणि 'चमकिला'चे शूटिंग करत होती. मित्र असल्याने राघवही परीला भेटायला तिथे पोहोचले. दोघे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरले. दिल्ली येथे अत्यंत आलिशान पद्धतीने राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा साखरपुडा मे महिन्यात पार पडला होता. या साखरपुड्याला अत्यंत जवळच्या लोकांनी उपस्थिती लावली होती.