परेश रावल यांचा 'द ताज स्टोरी' अडकला वादाच्या भोवऱ्यात, समाजात द्वेष पसरवण्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 10:36 IST2025-10-29T10:27:54+5:302025-10-29T10:36:36+5:30
परेश रावल यांचा आगामी 'द ताज स्टोरी' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला असून सिनेमाला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण?

परेश रावल यांचा 'द ताज स्टोरी' अडकला वादाच्या भोवऱ्यात, समाजात द्वेष पसरवण्याचा आरोप
ज्येष्ठ अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांचा आगामी चित्रपट 'द ताज स्टोरी' (The Taj Story) मुळे आता बॉलिवूडमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड करून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केल्याने या चित्रपटाला टीकेला सामोरं जावं लागत आहे. या सिनेमाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
चित्रपटावरील आक्षेप का?
'द ताज स्टोरी' हा चित्रपट ताजमहालच्या निर्मितीमागील इतिहासावर आधारित असल्याचा दावा केला जात आहे. पण काही लोकांच्या मते, हा चित्रपट केवळ खोटे ऐतिहासिक दावे करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. चित्रपटात दाखवलेले काही प्रसंग आणि दावे हे अधिकृत ऐतिहासिक नोंदींशी जुळत नसल्याचा आक्षेप आहे. समीक्षकांचे म्हणणं आहे, की या चित्रपटाच्या माध्यमातून ताज महालचा इतिहास विकृत केला जात आहे.
अनेक सोशल मीडिया युजर्स आणि काही गट असा दावा करत आहेत की, हा चित्रपट विशिष्ट समुदायाविरुद्ध द्वेष आणि नकारात्मकता पसरवत आहे. याशिवाय हा चित्रपट एकतर्फी कथा सादर करून धार्मिक भावना भडकावत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सिनेमाची रिलीज डेट जवळ येत असतानाच आग्रा आणि दिल्लीमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
परेश रावल यांची प्रतिक्रिया
परेश रावल यांनी अद्याप या आरोपांवर कोणतीही थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, चित्रपट निर्मितीच्या सुरुवातीपासूनच हा विषय संवेदनशील असल्याने तो वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे हा चित्रपट रिलीज झाल्यावर कोणत्या दृष्टिकोनातून ताजमहालची कथा लोकांसमोर कशी येते, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या चित्रपटाची रिलीज डेट जवळ आल्यावर हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान या वादांवर चित्रपटाची टीम आणि कलाकार काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे.