परेश रावल यांनी मेकर्सला व्याजासकट परत केले पैसै, 'हेरा फेरी ३' पासून दुरावले 'बाबुराव'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 11:22 IST2025-05-24T11:21:57+5:302025-05-24T11:22:32+5:30
साइनिंग अमाऊंट व्याजासकट केली परत, 'बाबुभैय्या'ला किती मिळणार होतं मानधन?

परेश रावल यांनी मेकर्सला व्याजासकट परत केले पैसै, 'हेरा फेरी ३' पासून दुरावले 'बाबुराव'
'हेरा फेरी'ची तिकडी अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी सध्या चर्चेत आहे. तिघंही 'हेरा फेरी ३'मध्ये एकत्र दिसणार होते. मात्र अचानक 'बाबूभैया' म्हणजेच परेश रावल (Paresh Rawal) यांनी सिनेमातून काढता पाय घेतला. विशेष म्हणजे त्यांनी काहीही ठोस कारणही दिलं नाही. तसंच दिग्दर्शक आणि अक्षय-सुनीलाही याबद्दल कल्पना नव्हती. परेश रावल यांनी सिनेमा सोडल्यानंतर अक्षय कुमारने त्यांच्यावर नुकसानभरपाईचा दावा केला. तर आता आलेल्या बातमीनुसार, परेश रावल यांनी मेकर्सला सिनेमाची साइनिंग अमाऊंट व्याजसह परत दिली आहे.
'हेरा फेरी ३'मधून बाबुराव आता वेगळे झाले आहेत हे कन्फर्म झालं आहे. बॉलिवूड हंगामा रिपोर्टनुसार, परेश रावल यांना सिनेमासाठी ११ लाख रुपये साइनिंग अमाऊंट मिळाली होती. ती आता त्यांनी १५ टक्के व्याजासह परत केली आहे. त्यांच्या सिनेमा सोडल्याने झालेलं नुकसानही त्यांनी भरुन काढलं आहे.
किती मिळणार होतं मानधन?
तसंच सिनेमाशी निगडीत सूत्रांनुसार, परेश रावल यांना सिनेमासाठी १५ कोटी रुपये मानधन मिळणार होतं. ज्यातील १४ कोटी ८९ लाख त्यांना सिनेमा रिलीज झाल्याच्या एक महिन्यानंतर मिळणार होते. पुढील महिन्यात सिनेमाचं शूट सुरु होणार होतं आणि २०२७ मध्ये सिनेमा रिलीज होणार होता. मात्र परेश रावल यांना या अटी मान्य नव्हत्या. त्यामुळे आता परेश रावल आणि अक्षय कुमार यांच्या कायदेशीर लढाईही सुरु झाली आहे.
अक्षय कुमारने केली केस
अक्षय कुमारने त्याच्या 'केप ऑफ गुड्स' प्रोडक्शन अंतर्गत परेश रावल यांच्या २५ कोटींची नुकसानभरपाईची केस केली आहे. सिनेमासंबंधी काही प्रोमो शूट झाले आहेत. 'भूत बंगला'च्या सेटवरच ते चित्रीत करण्यात आले होते.