पत्नी आणि मुलीसाठी पंकज त्रिपाठींनी मुंबईत खरेदी केले दोन आलिशान फ्लॅट्स, किंमत कोटींच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:09 IST2025-10-01T12:07:05+5:302025-10-01T12:09:07+5:30
पंकज त्रिपाठींनी मुंबईतील अंधेरी आणि कांदिवली भागात दोन फ्लॅट्स खरेदी केले आहेत. जागांची किंमत ऐकून थक्क व्हाल

पत्नी आणि मुलीसाठी पंकज त्रिपाठींनी मुंबईत खरेदी केले दोन आलिशान फ्लॅट्स, किंमत कोटींच्या घरात
'मिर्झापूर', 'गँग्ज ऑफ वासेपूर', 'क्रिमिनस जस्टिस' यांसारख्या सिनेमे आणि वेबसीरिजसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते म्हणजे पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi). पंकज यांनी मुंबईत स्वतःच्या कुटुंबासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. पंकज यांचं त्यांच्या मूळ घरी अर्थात बिहारला मोठं घर आहे. पण आता पंकज यांनी मुंबईत प्रॉपर्टीसाठी गुंतवणूक केली आहे. त्यांनी पत्नी आणि मुलीसाठी मुंबईत फ्लॅट्स खरेदी केले आहेत. त्याची किंमत कोटींच्या घरात आहे
पंकज त्रिपाठी यांचे आलिशान फ्लॅट्स
पंकज त्रिपाठी यांनी एक फ्लॅट अंधेरी पश्चिम (Andheri West) येथे घेतला आहे, ज्याची किंमत ९.९८ कोटी रुपये आहे. हा फ्लॅट सुमारे २००० स्क्वेअर फूटहून अधिक आहे. याशिवाय पंकज यांनी केलेल्या डीलमध्ये तीन गाड्यांच्या पार्किंगसाठी जागा खरेदी केली आहे. दुसरा फ्लॅट त्यांनी कांदिवली पश्चिम (Kandivali West) येथे खरेदी केला आहे, ज्याची किंमत ८७ लाख रुपये आहे. हा फ्लॅट ४२५ स्क्वेअर फूट कार्पेट एरियाचा आहे. अशाप्रकारे पंकज यांनी मुंबईत मोक्याच्या जागी दोन फ्लॅट्समध्ये गुंतवणूक केली आहे.
पंकज त्रिपाठी यांनी 'गँग्स ऑफ वासेपूर', 'स्त्री', 'लुडो' आणि 'मिर्झापूर' सारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मेहनतीच्या जोरावर पंकज त्रिपाठींना आज हिंदी सिनेसृष्टीत त्यांच्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली. नुकतीच पंकज त्रिपाठींची प्रमुख भूमिका असलेल्या 'क्रिमिनल जस्टिस ४' या वेबसीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पंकज त्रिपाठींच्या आगामी प्रोजेक्टबद्दल अद्याप माहिती समोर नाही.