"आम्हाला रॉयल्टी मिळायला हवी!"; पाकिस्तानी पोलिसाची 'धुरंधर २'च्या निर्मात्यांकडे भलतीच मागणी, म्हणाला- "यातून पैसे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 11:47 IST2026-03-23T11:41:28+5:302026-03-23T11:47:24+5:30
नुकतंच पाकिस्तानच्या पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने 'धुरंधर' चित्रपटाच्या निर्मात्यांकडे चक्क 'रॉयल्टी'ची मागणी केली आहे. काय आहे नेमकं प्रकरण?

"आम्हाला रॉयल्टी मिळायला हवी!"; पाकिस्तानी पोलिसाची 'धुरंधर २'च्या निर्मात्यांकडे भलतीच मागणी, म्हणाला- "यातून पैसे..."
रणवीर सिंगचा 'धुरंधर २' (Dhurandhar 2) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत असून अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतात या चित्रपटाची जेवढी चर्चा आहे, त्यापेक्षा जास्त चर्चा सध्या पाकिस्तानात होताना दिसत आहे. नुकतंच पाकिस्तानच्या पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या चित्रपटाच्या निर्मात्यांकडे चक्क 'रॉयल्टी'ची मागणी केली आहे. काय आहे नेमकं प्रकरण?
पाकिस्तानच्या सिंध पोलीस दलाचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (DIG) उमर शाहिद हामिद यांनी 'डिजीटॉक' नावाच्या एका पॉडकास्टमध्ये या चित्रपटावर भाष्य केले. उमर शाहिद म्हणाले की, "आम्ही आपापसात हसत हसत चर्चा करत होतो की, चित्रपटात जे काही दाखवले आहे ते आम्ही ल्यारीमध्ये प्रत्यक्ष अनुभवले आहे. जर बॉलिवूड या विषयावर चित्रपट बनवत असेल, तर आम्हाला रॉयल्टी मिळायला हवी. मात्र, आम्हाला यातून कोणतेही पैसे मिळालेले नाहीत."
'धुरंधर २' मध्ये पाकिस्तानमधील ल्यारी येथील गँग वॉरचे चित्रण करण्यात आले आहे. चित्रपटात एसपी चौधरी अस्लम या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत संजय दत्त दिसतो. चौधरी अस्लमसोबत चष्मा लावलेला आणखी एक साहाय्यक पोलील अधिकारी दिसतो. 'धुरंधर २'मध्ये हाच पोलीस अधिकारी हमजाचं खरं रुप सर्वांसमोर आणतो. या तरुण पोलीस अधिकाऱ्याचा रोल प्रत्यक्ष उमर शाहिद हामिद यांच्या आयुष्यावर आधारीत आहे अशी चर्चा आहे.
उमर शाहिद हामिद हे केवळ एक पोलीस अधिकारीच नाहीत, तर ते एक प्रसिद्ध लेखक देखील आहेत. त्यांनी ल्यारी गँग वॉर आणि तिथल्या गुन्हेगारी जगतावर सखोल लेखन केले आहे. चित्रपटातील घटना आणि पात्रे त्यांच्याशी साधर्म्य दर्शवत असल्यामुळेच त्यांनी ही मागणी गमतीने पण स्पष्टपणे मांडली आहे. सध्या पाकिस्तानात हा चित्रपट अधिकृतपणे प्रदर्शित झालेला नसला तरी, तिथल्या सोशल मीडियावर या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.