'ऑस्कर'साठी नॉमिनेट झालेला हा चित्रपट ओटीटीवर हिट, IMDb वर ८ रेटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 17:48 IST2025-11-25T17:48:41+5:302025-11-25T17:48:57+5:30
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण ओटीटीवर हिट!

'ऑस्कर'साठी नॉमिनेट झालेला हा चित्रपट ओटीटीवर हिट, IMDb वर ८ रेटिंग
Oscar Nominated Homebound Releases On Netflix : ग्लॅमर, रोमान्स आणि ड्रामाच्या पलीकडे जाणारे काही चित्रपट असतात. ज्यातून समाजाचा आरसा दाखवला जातो. हे चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करत नाहीत, ते विचार करायला भाग पाडतात. असाच एक चित्रपट नुकताच ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला यश मिळालं नसलं, तरी समीक्षकांकडून या चित्रपटाला भरपूर प्रशंसा मिळाली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर येताच हा चित्रपट ट्रेंड करतोय. तो चित्रपट आहे 'होमबाउंड'.
'होमबाउंड' चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली आहे. हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाला होता, इतकेच नव्हे तर तो २०२६ च्या ऑस्करसाठीही नामांकित झाला आहे. हा टॉप-रेटेड चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जोरदार ट्रेंड करत आहे. तो नेटफ्लिक्सच्या टॉप १० ट्रेंडिंग लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. चित्रपटाला आयएमडीबीचं ८ असं रेटिंग मिळाली आहे.
'होमबाउंड' चित्रपट २६ सप्टेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पण, या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपयश आले. सुमारे ३-४ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉलिवूड हंगामाच्या मते, फक्त ३ कोटींची कमाई केली आणि तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र, थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी जेव्हा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला, तेव्हा त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
'होमबाउंड'ची चित्रपटाची कथा ही सरकारी नोकरी मिळविण्यासाठी होणारा संघर्ष, शिक्षण व्यवस्था, जातीयवाद, धर्म आणि भेदभाव यासारख्या अत्यंत गंभीर आणि ज्वलंत मुद्द्यांवर प्रकाश टाकते. धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित, हा चित्रपट नीरज घायवान यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची कथा ईशान खट्टर आणि विशाल जेठवा यांच्याभोवती फिरते. हे दोघे कॉन्स्टेबल बनण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असल्याचे दाखवले आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर ही एका छोट्या भूमिकेत झळकली आहे. याशिवाय शालिनी वत्स आणि चंदन के. आनंद हेही मुख्य भूमिकेत आहेत.