डॉ. कलाम यांच्या भूमिकेसाठी धनुषचीच निवड का केली? ओम राऊत म्हणाले, "त्याच्यापेक्षा चांगला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 16:00 IST2025-05-28T16:00:06+5:302025-05-28T16:00:49+5:30

या भूमिकेसाठी धनुषलाच का घेतलं? यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

om raut reveals why he chose dhanush for the role of dr kalam in biopic | डॉ. कलाम यांच्या भूमिकेसाठी धनुषचीच निवड का केली? ओम राऊत म्हणाले, "त्याच्यापेक्षा चांगला..."

डॉ. कलाम यांच्या भूमिकेसाठी धनुषचीच निवड का केली? ओम राऊत म्हणाले, "त्याच्यापेक्षा चांगला..."

दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut)  यांनी यंदा कान्समध्ये आगामी सिनेमाची घोषणा केली. जनतेचे राष्ट्रपती, 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा बायोपिक रुपेरी पडद्यावर येणार आहे. 'कलाम: द मिसाईल मॅन ऑफ इंडिया' असं सिनेमाचं टायटल आहे. ओम राऊत यांनी या सिनेमासाठी अभिनेता धनुषची (Dhanush) निवड केली आहे. दरम्यान या भूमिकेसाठी धनुषलाच का घेतलं? यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवात चित्रपटाच्या शीर्षकाचे उद्घाटन करण्यात आले जिथे ओम राऊत यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी सविस्तर चर्चा केली आणि मुख्य भूमिकेसाठी धनुषची निवड का केली, हे सांगितले. चित्रपटाविषयी बोलताना राऊत म्हणाले, "डॉ. कलाम यांचे विचार प्रत्येक तरुणाच्या मनात खोलवर रुतलेले आहेत. कॉलेजच्या काळात मी त्यांची 'विंग्स ऑफ फायर' ही आत्मकथा वाचली होती आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर आज मी जे काही करतो आहे किंवा जे काही व्हायचं स्वप्न बघतो आहे त्याचं मूळ त्या पुस्तकात आहे. त्या पुस्तकाने माझा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला आणि म्हणूनच मी आज इथे उभा आहे.”

ते पुढे म्हणाले, "डॉ. कलाम यांचा जीवनप्रवास नेहमीच मला प्रेरणा देत आला आहे. मी जाणलं की त्यांच्या आयुष्याचे तीन प्रमुख आधारस्तंभ होते. त्याच पहिलं शिक्षण. ते एक महान शिक्षक होते आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला ते खूप महत्त्व द्यायचे. दुसरं, नवोन्मेष — विशेषतः स्वदेशी नवोन्मेष. त्यांनी नेहमी आपल्या देशातच निर्माण करण्यावर भर दिला. आणि तिसरं, दृढ निश्चय — आपल्या ध्येयासाठी अविचल समर्पण. मी नेहमीच असा चित्रपट बनवण्याची धारणा ठेवली होती जो या तीन मूल्यांना प्रभावीपणे दर्शवेल. देवाच्या कृपेने, निर्माते अभिषेक अग्रवाल यांच्याकडून हाच विषय घेऊन प्रस्ताव आला. जेव्हा त्यांनी विचारले की मला स्वारस्य आहे का तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी आधीच यावर काम करत आहे. ते हैदराबादहून मुंबईत आले. आम्ही सविस्तर चर्चा केली आणि शेवटी टी-सीरीज व भूषण कुमार हेही या प्रकल्पात सहभागी झाले. हे आमचं तिसरं एकत्र काम असून आम्ही पूर्ण ताकदीने पुढे जात आहोत.”

धनुषला मुख्य भूमिकेसाठी निवडण्यावर राऊत म्हणाले, "जेव्हा तुम्ही डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाला मोठ्या पडद्यावर साकारायचं ठरवता, तेव्हा केवळ त्यांच्या यशाचं नव्हे तर त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचं आणि शिकवणीचंही प्रतिबिंब पडद्यावर उमटलं पाहिजे. हेच कोणत्याही बायोपिकचं सर्वात कठीण आणि संवेदनशील टप्पा असतो. आणि मला असं वाटतं की धनुषपेक्षा ही खोली आणि भावना नीट साकारणारा दुसरा कोणताही अभिनेता असू शकला नसता. तो या भूमिकेसाठी परिपूर्ण आहे. माझ्या संपूर्ण टीमकडून मी त्याचे मन:पूर्वक आभार मानतो की तो या महत्त्वाच्या प्रकल्पाचा भाग बनला आहे.”

'तानाजी: द अनसंग वॉरिअर', 'लोकमान्य' यांसारख्या प्रशंसित चित्रपटांचे दिग्दर्शक ओम राऊत यावेळी ‘कलाम: द मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ चे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत धनुष असणार आहे आणि निर्मिती करत आहेत अभिषेक अग्रवाल, ज्यांनी द काश्मीर फाइल्स आणि परमाणु यांसारख्या प्रभावी चित्रपटांची निर्मिती केली आहे.  साईविन क्वाड्रस यांनी स्क्रिप्ट लिहिली आहे, जे 'नीरजा' आणि 'मैदान' या प्रभावी बायोपिकसाठी ओळखले जातात.

डॉ. कलाम यांच्या रामेश्वरममध्ये घालवलेल्या बालपणापासून ते राष्ट्रपती भवनातील त्यांच्या कार्यकाळापर्यंतचा प्रवास — एक शास्त्रज्ञ, शिक्षक, दूरदृष्टी असलेले नेतृत्व आणि लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून झालेली त्यांची घडण — हे सर्व या चित्रपटात सखोलपणे मांडले जाणार आहे. “मिसाईल मॅन ऑफ इंडिया” म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. कलाम यांची प्रेरणादायक वारसा ‘विंग्स ऑफ फायर’ च्या माध्यमातून आजही पिढ्यानपिढ्या प्रभाव टाकत आहे.

हा चित्रपट केवळ एक बायोपिक न राहता, नेतृत्व, राष्ट्रनिर्माण आणि नैतिक मूल्यांची खोली दाखवणारी एक प्रभावशाली सिनेमॅटिक आदरांजली असेल — अशा व्यक्तिमत्त्वाला, ज्याने संपूर्ण राष्ट्राच्या स्वप्नांना दिशा दिली.

Web Title: om raut reveals why he chose dhanush for the role of dr kalam in biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.