काळ्या जादूवर विश्वास ठेवते अभिनेत्री नुसरत भरूचा? म्हणाली "मला धक्का बसला जेव्हा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 14:50 IST2025-04-09T14:48:49+5:302025-04-09T14:50:08+5:30
अभिनेत्री नुसरत भरूचानं काळ्या जादूवर भाष्य केलं.

काळ्या जादूवर विश्वास ठेवते अभिनेत्री नुसरत भरूचा? म्हणाली "मला धक्का बसला जेव्हा..."
अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha)आज हे नाव बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत आहे. पण, यासाठी नुसरतला अपार संघर्ष करावा लागला. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर ती इथपर्यंत पोहोचली. आता ती 'छोरी २' (Chhori 2 Movie) हॉरर थ्रिलर चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री सोहा अली खान(Soha Ali Khan)ही दिसणार आहे. नुकतंच 'छोरी २' सिनेमाच्या टिमनं 'झुम'ला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्री नुसरत भरूचानं काळी जादू आणि जादूटोण्यावर भाष्य केलं.
नुसरत भरूचाने काळी जादूबद्दलचे तिचे विचार मांडले. अभिनेत्री म्हणाली, "मला खरोखर वाटलं नव्हतं की आजच्या काळातही लोक काळी जादू असं काही करत असतील. माझा विश्वास नव्हता. पण 'शैतान' हा चित्रपट पाहिल्यानंतर मला खरोखरच धक्का बसला. तेव्हा पहिल्यांदाच मला त्याचा अर्थ समजू लागला. अशा प्रकारच्या जादूचे एक विशिष्ट नाव आहे. याबद्दल जेव्हा काही लोकांनाही विचारलं तेव्हा ही जादू खूप प्रचलित असल्याचं कळालं. मला वाटतं की ते अशा गोष्टीवर चित्रपट बनवणार नाहीत, ज्याचा वास्तविक आधार किंवा वास्तवाशी संबंध नाही".
पुढे म्हणाली, "माझी फक्त अशी इच्छा आहे की जग हे एक आनंदी, दयाळू ठिकाण असावं. पण ते अधिकाधिक गडद आणि भयानक होत चालले आहे". विशाल फुरिया दिग्दर्शित 'छोरी २' सिनेमा ११ एप्रिलला अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. २०२१ साली रिलीज झालेल्या 'छोरी' चित्रपटाचा सिक्वेल आहे. या हॉरर चित्रपटात गश्मीर महाजनी, सौरभ गोयल, पल्लवी अजय, कुलदीप सरीन आदी कलाकार आहेत.