Rajpal Yadav: "कोणीही आर्थिक मदत केली नाहीये..."; राजपाल यादवच्या भावाचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 10:29 IST2026-02-12T10:25:34+5:302026-02-12T10:29:38+5:30
सोशल मीडियावर अनेक जण त्यांना आर्थिक मदत करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, राजपाल यादव यांचे मोठे भाऊ श्रीपाल यादव यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

Rajpal Yadav: "कोणीही आर्थिक मदत केली नाहीये..."; राजपाल यादवच्या भावाचा खळबळजनक दावा
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव सध्या चेक बाऊन्स प्रकरणात कायदेशीर अडचणींचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावर अनेक जण त्यांना आर्थिक मदत करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, राजपाल यादव यांचे मोठे भाऊ श्रीपाल यादव यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. याशिवाय कोणीही आर्थिक मदत केली नाही, असंही ते म्हणाले.
मदतीचा दावा फेटाळला
श्रीपाल यादव यांनी 'दैनिक भास्कर'शी बोलताना स्पष्ट केले की, राजपाल यांना आतापर्यंत कोणाकडूनही पैसे मिळालेले नाहीत. ते म्हणाले, "जर लोकांनी मदत केली असेल, तर ते पैसे नक्की कुठे दिले गेले आहेत हे सांगावे. राजपाल यांचे खाते सांभाळणाऱ्या व्यक्तीनेही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाल्याची पुष्टी केलेली नाही. जर खरोखरच कोणी मदत केली असेल तर कुटुंब त्यांचे आभारी राहील, पण सध्या केवळ सोशल मीडियावरच विधाने केली जात आहेत, जे चुकीचे आहे."
आपल्या भावाने घेतलेल्या कर्जाबाबत बोलताना श्रीपाल यांनी सांगितले की, राजपाल यांनी कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक कर्ज घेतले नव्हते. त्यांनी त्यांच्या 'अता पता लापता' या चित्रपटात पैसे गुंतवले होते. काही कागदपत्रांवर त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या आणि चित्रपट फ्लॉप झाल्यावर त्याच स्वाक्षऱ्यांचा आधार घेऊन त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली.
घरात लग्नाची तयारी
राजपाल यादव तुरुंगात असल्याने त्यांच्या घरात दुःखाचे वातावरण असल्याचे काही बातम्यांमध्ये म्हटले होते. यावर श्रीपाल यादव यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीचे (राजपाल यांची पुतणी) लग्न असून घरात जय्यत तयारी सुरू आहे. "आमच्या घरी ५० लोक लग्नाची तयारी करत आहेत. अशा वेळी दुःखाचं वातावरण कसं असेल? राजपाल उद्यापर्यंत बाहेर येतील आणि आम्ही धुमधडाक्यात लग्न साजरे करू, अशी आम्हाला खात्री आहे," असेही त्यांनी नमूद केले.
काय आहे प्रकरण?
२०१० मध्ये राजपाल यादव यांनी त्यांच्या दिग्दर्शनातील 'अता पता लापता' या पहिल्या चित्रपटासाठी ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले. व्याजासह ही रक्कम आता वाढली असून, याच थकबाकीच्या आणि चेक बाऊन्सच्या प्रकरणात त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागत आहे.