Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 12:20 IST2025-05-10T12:20:20+5:302025-05-10T12:20:43+5:30
Operation Sindoor Movie : सीमेवर भारतीय जवान आपल्या जीवाची पर्वा न करता देशाचे रक्षण करत आहेत. दुसरीकडे 'ऑपरेशन सिंदूर'वरील सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे आणि पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आले आहे.

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
२०१९ साली प्रदर्शित झालेल्या उरी-द सर्जिकल स्ट्राइक सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. याशिवाय देशभक्तीवर आधारीत बऱ्याच सिनेमांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. याच कारणामुळे २०२५मध्ये सुरू असलेल्या भारत आणि पाकिस्तानात सुरू असलेल्या तणावावर सिनेमा बनवण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. मात्र या परिस्थितीत या विषयावर सिनेमा बनवणाऱ्यांवर नेटकरी नाराज झाले आहेत आणि या सिनेमावरील पोस्टर समोर येताच लोकांनी निर्मात्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे.
एक-दोन नाही तर बरेच चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांनी ऑपरेशन सिंदूर या शीर्षकाने आपला सिनेमा रजिस्टर करण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र हे टायटल नक्की कोणाला मिळणार, हे अद्याप ठरलेलं नाही. पण आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान दिग्दर्शक उत्तम माहेश्वरी आणि नितीन कुमार गुप्ता यांनी या विषयावर बनवत असलेल्या सिनेमाची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या प्रॉडक्शनची जबाबदारी निकी विकी भगनानी फिल्म्स आणि द कॉन्टेंट इंजिनिअरकडे देण्यात आली आहे.
ऑपरेशन सिंदूर या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले. यात युद्धजन्य परिस्थितीत भारतीय जवानांपैकी एक जवान हातात बंदूक घेऊन दिसत आहे. पोस्टरवर ऑपरेशन सिंदूरच्या आधी भारत माता की जय असे लिहिण्यात आलंय.
नेटकरी भडकले
हे पोस्टर पाहून नेटकरी नाराज झाले आहेत आणि ते टीका करत आहेत. एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, स्वतः आपल्या देशाची थट्टा करू नका. दुसऱ्या युजरने लिहिले की, लाज वाटली पाहिजे तुम्हाला आणि संपूर्ण बॉलिवूडला प्रत्येक गोष्टीत पैसे छापण्याचे माध्यम बनवले आहे. ऑपरेशन सिंदूर अद्याप संपले नाही आणि तुम्ही सगळे या चिंताजनक परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहात. प्रार्थना करतो की तुमचे कर्म तुम्हाला चांगलाच धडा शिकवेल. आणखी एकाने लिहिले की, युद्ध अजून बाकी आहे मित्रा. अनेकांनी निर्मात्यांना कमेंट करून चांगलेच फटकारले आहे.